मूल : तालुक्यातील चिखली येथे आंतरजातीय प्रेमीयुगुलाचा विवाह तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने पार पडला. एकाच गावातील विवेक नारायण घोगरे व रूपाली पुनेश्वर कोवे हें दोघे आंतरजातीय असले तरी मागील कित्येक वर्षांपासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणा- भाका घेतल्या होत्या. भिन्न जातीचे असल्याने विवेक व रुपाली यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे विवाह होणे कठीण होते. मात्र, विवेक व रूपाली यांनी गावातीलच तंटामुक्त समितीकडे रीतसर अर्ज देत दोघांचाही विवाह लावून देण्याची विनंती केली. तंटामुक्त समितीने दोघांच्याही कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध कायम असल्याने अखेर तंटामुक्त समितीने व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी विवेक व रूपाली यांचा ग्रामपंचायत भवनात विवाह लावून दिला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ काटवले, उपाध्यक्ष बबन कडस्कर, उपसरपंच दुर्वास कडसकर, पोलिस पाटील पूनम मडावी, प्रीती चिमूरकर, धनराज कडसकर, संतोष कडसकर, नारायण घोगरे व ग्रामस्थ उपस्थित होते.