देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील एका इसमाने विष प्राशन करून केली आत्महत्या


कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज २६ मे २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर इसमाचे नाव दिलीप रामचंद्र झिलपे, वय ५५ वर्षे असून कोंढाळा पासून काही अंतरावर पटाच्या दानिकडे असलेल्या नहराच्या कडेला मृतावस्थेत आढळून आला. सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गावातील महिला वर्ग व इतर नागरिक पटाच्या दानिवरून काम करून परत येत असतांना नहराच्या कडेला एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर इसमाच्या जवळ दुपारच्या सुमारास कामावरून परत येत असणाऱ्या महिला वर्ग व इतर नागरिक गेले असता जवळच विषाची बॉटल व इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देताच, लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता; कोंढाळा येथील रहिवासी असलेले दिलीप झिलपे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिक व बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली होती. गावातील पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यास कळवताच कोंढाळा बिटचे जमादार (पोलीस अंमलदार) मदन मडावी व गणेश बहेटवार यांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा केला व शविच्छेदनासाठी सदर इसमाचे प्रेत देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्ग दर्शनाखाली करीत आहेत. सदर इसमाने विष प्राशन करून आत्महत्या कशामुळे केली? अजूनपर्यंत कळलेले नाही...