नदीत आंघोळीला गेला अन् जीव गमावून बसलादेसाईगंज शहरापासून - दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीत ७ मे रोजी दुपारच्या सुमारास मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा अखेर प्रेतच आढळून आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अरहान शब्बीर शेख (१५) असे वैनगंगा नदीत आंघोळीला जाऊन पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अरहान हा ७ मे रोजी दुपारच्या सुमारास आपल्या ४-५ मित्रांसमवेत लगतच्या वैनगंगा नदीत आंघोळीला गेला होता. नियोजनाप्रमाणे सर्व मित्र आंघोळ करीत असताना अरहान अचानक बेपत्ता झाला.

ही बाब मित्रांच्या लक्षात येताच उर्वरित सर्व मित्र घाबरून पळून आले. इकडे अरहानचा कुठेच पत्ता लागत नाही म्हणून घरच्यांनी इकडे-तिकडे शोधाशोध सुरू केली. मात्र कुठूनच माहिती मिळत नसल्याचे पाहून घाबरलेला परिवार पोलिसांत धाव घ्यायला निघाले असता अरहानच्या एका मित्राने घटनेबाबत घरच्यांना माहिती दिली. त्याअनुषंगाने सकाळी शोध घेतला असता अरहानचे प्रेतच पाण्यात तरंगताना आढळून आले. त्यामुळे कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.
अरहान हसतमुख स्वभावाचा असल्याने ना जात ना पात, तो सर्वांना आपलासा वाटत होता. मात्र नियतीने त्याच्यावर काळाची झडप घालून आपल्यातून कायमचे हिरावून घेतल्याचे समजताच शहराच्या कमलानगर, जवाहर वॉर्डात अश्रूंचा बांध फुटला.


पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता भोपळे व रेकचंद पत्रे करीत आहेत. विशेष म्हणजे, अरहानच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे शहराच्या कमलानगर व जवाहर वॉर्डात शोककळा पसरली आहे. अनेकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून अरहानच्या घराकडे धाव घेतली.