यवतमाळ: अल्पवयीन मामेबहिणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आतेभावावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना यवतमाळ तालुक्यातील एका गावात घडली असून पोलिसांनी २२ वर्षीय आतेभावाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेला सुट्या असल्याने १२ मार्चला यवतमाळ तालुक्यातील एका गावात आपल्या आत्याकडे आली होती. त्यानंतर तिचे आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, आतेभावाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. दरम्यान, काही दिवसानंतर प्रकृती खराब झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती दीड महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनीच थेट ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत अल्पवयीन मुलीच्या आईसोबत संपर्क साधला. ही बाब ऐकताच अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. पोलिसांनी रविवारी आतेभावाला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कौराशे, ज्ञानेश्वर मातकर करीत आहेत.