ता.प्र / कोरची, 12 मे : अनेकांच्या कुटुंबात घरगुती वाद होत असतात मात्र ते वाद विकोपाला गेल्यास अनर्थ घडून हत्या सारख्या घटना घडत असतात. अशाचप्रकारची घटना कोरची तालुक्यापासून 15 किमी असलेल्या बोंडे येथे बुधवारी रात्रोच्या सुमारास घडली. झाले असेल की, घरगुती वादातून पतीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून पत्नीची हत्या केली. समसोबाई रावजी कल्लो (55) असे मृत पत्नीचे नाव असून हत्या केल्यानंतर पती फरार झाला होता मात्र पोलिसांनी फरार आरोपी पती रावजी कल्लो यास अटक केली आहे.
बोंडे येथील मृतक समसोबाई कल्लो या बुधवारी रात्रीच्या सुमारास जेवण करुन झोपी गेल्या. दरम्यान पती रावजी कल्लो याने दारु पिऊन घरी येऊन पत्नीशी वाद घातला. तो वाद विकोपाला पोहचल्याने रावजीने रागाच्या भरात पत्नीच्या कानावर, डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले यात समसोबाईचा जागीच मृत्यू झाला. हत्या करून रावजी घटनास्थळावरुन फरार झाला. सदर घटनेची तक्रार मृतकाचा मुलगा स्वप्नील रावजी कल्लो याने कोरची पोलिस ठाण्यात केली असता कोरची पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 302 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेत गुरुवारी अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल फरतडे करीत आहेत.