कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह





तळोधी: गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नागभीड वनपरिक्षेत्रातील बाळापूर येथील एफडीसीएमच्या जंगलात रविवारी •आढळून आला. मृताचे नाव राजू वासुदेव मेश्राम (वय ४५) असे आहे. पाहर्णी येथील मृतक हा वेडसर होता. दोन-तीन महिन्यांपासून तो घरी निघून गेला होता. घरी परतेल असे घरच्यांना वाटले होते. मात्र, तो घरी परतला नव्हता. मृतक दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याची पत्नी दहा वर्षांपूर्वीच सोडून गेली. त्यानंतर तो वेडसरसारखा वागू लागला होता. घरून निघून गेल्यानंतर तो जंगलात भटकत होता. रविवारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहे.