कर्नाटकमध्ये ३८ वर्षीय प्रदीप ईश्वर यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे ते कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात तरुण आमदार बनले आहेत. चिक्काबल्लापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी हा विजय मिळवला. काँग्रेस पक्षाला दक्षिण भारतात, विशेषत: कर्नाटकात मोठा जनाधार आहे. माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील अनाथ मुलाला काँग्रसने आमदारकीचं तिकीट दिलं. कुठलेही पैसे न खर्च करता मी जिंकूनही आलो, यावरुनच आजही लोकशाही जिवंत असल्याचे दिसून येते. मी काँग्रेस पक्षाला धन्यवाद देतो,असे प्रदीप ईश्वर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या खास लिस्टमधील मंत्री म्हणून के. सुधाकर यांचं नाव घेतलं जात. मात्र, कोचिंग क्लासेचचा संचालक असलेल्या प्रदीप ईश्वरने त्यांना चिक्काबल्लापूर मतदारसंघातून १०, ६४२ मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे विजयी जल्लोष साजरा करताना हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच, लोकशाही जिवंत असून बाबासाहेबांमुळेच आज एक अनाथ मुलगा आमदार झाल्याचं ईश्वर यांनी म्हटले.