मुलीच्या विरहात आईची गळफास घेऊन आत्महत्या





हृदयद्रावक घटना : तीन महिन्यात दुसरा घटना 

 गडचिरोली : तीन महिन्यांपूर्वी मुलीने आत्महत्या केल्याने मानसिक तणावात आलेल्या आईने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली शहरातील इंदिरानगरात ११ मे रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली.

सुषमा गाथाराम निकुरे (४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुषमा यांची दहाव्या वर्गात शिकत असलेली पुनम हिने तीन महिन्यापूर्वी घरीच गळफास घेतला होता. मुलीने गळफास घेतल्याचे सुषमाने चांगलेच मनावर घेतले होते. त्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली होती. अधून-मधून बडबडत करत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. घटनेच्या दिवशी पती गाथाराम निकुरे हे कामासाठी तळोधी येथे गेले होते. दुसऱ्या वर्गात शिकत असलेला मुलगा खेळण्यासाठी शेजारच्या घरी गेला होता. नेमकी हीच वेळ बघून सुषमाने घराच्या आळ्याला ओढणीने बांधून गळफास घेतला. मुलगा घरी



आला असता ही बाब लक्षात आली. शेजारच्यांना बोलावून तिला खाली उतरविले. मात्र, तोपर्यंत तिचा जीव गेला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीनंतर आईनेसुद्धा आत्महत्या केल्याने इंदिरानगरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारीच सुषमाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


जीवन सुंदर मानणाऱ्या सुषमाचे टोकाचे पाऊल

आत्महत्या करण्यापूर्वी सुषमाने घरच्या कपाटावर पतीला उद्देशून खडूने लिहून ठेवले आहे." यात आयुष्यात बायकोसोबत कधी खोटे बोलायचे नाही. तुम्ही खरे आयुष्य जगा, जीवन खूप सुंदर आहे. तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा. माझे आयुष्य सुंदर समजून मला विसरा. आई-वडील बोलले तरी मनावर घेऊ नका. माझ्या स्वखुशीने जात आहे, असे लिहून ठेवले आहे.