पहिली सोडली, दुसरीशी सूत, तिसरीला पळविली... संभाजीनगर: लग्न केलेली बायको चार मुलांसह सोडून दिली. त्यानंतर दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. तिच्यापासून एक मुलगी झाली. ते कमी म्हणून की काय त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले. तिलाही याच्यापासून एक मुलगा झाला. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) या आधुनिक 'खोबा लोखंडे 'स बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली.

सुभाष फकिरा राठोड (४१, मूळ रा. पोखर्णी, जि. परभणी, ह.मु. इंदिरानगर)

असे आरोपीचे नाव आहे. येत्या ५ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या अल्पवयीन मुलीस त्याने २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला. गुन्ह्याचा तपास १६ जून २०२२ रोजी 'एएचटीयू'कडे सोपविला. या पथकाने बारकाईने तपास करीत मुलीचा शोध घेत राठोड यास बेड्या ठोकल्या. मुलीला पळविले तेव्हा तिचे वय १६ वर्षे होते. राठोडपासून तिला मुलगा झाला. सध्या तो पाच महिन्यांचा आहे. मुलीचा शोध लागल्यानंतर तिला पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपविले आहे.

निराधार मुलीस ओढले जाळ्यात

पीडित अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांचे निधन कोरोनाच्या काळात झाले. त्यानंतर मुलगी आजीकडे राहत होती. फुलांचे गजरे विकून आलेले पैसे आजीच घेत होती. त्यातच आजी तिला त्रासही देत होती. याचा फायदा घेत ४१ वर्षांच्या राठोडने १६ वर्षांच्या मुलीला मदत करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले.पहिल्या दोन असताना तिसरी आणली

सुभाष राठोडचा अधिकृत विवाह झालेला आहे. त्याला विवाहाच्या पत्नीपासून तीन मुली, एक मुलगा आहे. ही महिला मुलांसह माहेरी राहते. त्यानंतर दुसरीला एक मुलगी आहे. नंतर तिसरी अल्पवयीन मुलगी आणली. तिलाही राठोडपासून एक मुलगा झाला. या दोघी एकत्रच राहत होत्या हे विशेष.