गडचिरोली, 9 मे : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन डोक्यावर कुन्हाडीने वार करून हत्या करणाऱ्या आरोपी पतीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी मंगळवार 9 मे रोजी सुनावली. शामराव रुषीजी शेंडे (38) रा. मुडझा ता. जिल्हा गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे
प्राप्त माहीतीनुसार, आरोपी पतीला दारूचे व्यसन होते, नेहमीच
पत्नी निरंजनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसोबत भांडण करायचा, या त्रासाला कंटाळून पत्नी मुलांसह माहेरी गेली. तब्बल दोन वर्षानंतर शामराव हा यापुढे त्रास देणार नाही आई म्हणून घरी परत आणला मात्र काही दिवसातच त्यांच्यात भांडण झाले. दरम्यान 29 सप्टेंबर 2020 रोजी रात्री शामराव ने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. याबाबत पोलीस ठाणे गडचिरोली येथे मृतकाच्या वडिलांनी तक्रार दाखल असता 438/2020 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून मंगळवार 9 मे 2023 रोजी आरोपी पती शामराव रुषीजी शेंडे याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 302 भादवी मध्ये जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे, एन. एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोनि प्रदीप वसंतराव चौगावकर व सपोनि / शरद मेश्राम पोस्टे गडचिरोली यांनी केला आहे. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.