वैरागड : वनपरिक्षेत्र पोर्ला अंतर्गत येणाऱ्या गणेशपुर बिटात चरायला गेलेल्या बैल व गायीवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना २८ एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
गणेशपूर येथील देवीदास हनाजी कोहपरे यांचा बैल व योगेंद्र बाबनवाडे यांची गाय नेहमीप्रमाणे गुराखी जंगलात घेऊन गेला असता, गावापासून २ किमी अंतरावर वाघाने हल्ला करून बैलास ठार केले. गणेशपूर (शिरसी) येथील क्षेत्र सहायक डी. डी. उईके, वनरक्षक श्रीकांत शेलोटे, नितीन गटपायले यांनी घटनास्थळावर भेट दिली असता, घटनास्थळापासून शंभर मीटर
अंतरावर गाय ठार झाल्याची दुसरी घटना दिसून आली. घटनेचा पंचनामा केला. जागेवर वाघाच्या पाऊल खुणा आढळून आल्याने व बैलावर वाघाने हल्ला केल्याचे सिद्ध झाल्याने विभागाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकाच दिवशी दोन जनावरांवर वाघाने हल्ला केल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.