गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे चाळीस वर्षीय इसमाने अंगणवाडी जवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 मे मंगळवारी 12 वाजताच्या सुमारास घडली. मनोहर कुकुडकार वय 40 वर्ष रा. आष्टी. ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे. मृतक हा मूळचा धामणगाव ता. गोंडपिपरी तालुक्यातील असून त्याची सासुरवाडी ही आष्टीची असल्याने तो सहा ते सात वर्षांपासून आष्टी येथेच वास्तव्यास कुंभरे यांच्या घरी रहात होता. तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होता. 16 मे मंगळवारी दुपारच्या सुमारास घराजवळ असलेल्या विहीरीत त्याने उडी मारली. विहीरीत उडी मारताना त्याच्या मुलाने बघताच आरडाओरड केली. घराशेजारी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले परंतू त्याचा मृतदेहच विहीरीत तरंगत वर आला. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.