म्हणून म्हणतो दादा दारू नका विकू ,आरोपीला चक्क झाली 3 वर्ष जेल


गडचिरोली: (chamorshi) तालुक्यात मोहफुलाची दारु राहत्या घरी बाळगून तिची विक्री करणाऱ्या आरोपीला चक्क चामोर्शी न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा 15 मे रोजी ठोठावली आहे. सदर कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. नारायण मुकुंदो मंडल (48) रा. विष्णुपूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील विष्णुपूर येथील नारायण मंडल हा राहत्या घरातून अवैधरित्या मोहफूल दारुविक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी पंचांसह आरोपीच्या घरी धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. दरम्यान आरोपीच्या राहते घरी एकूण 100 लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करुन आरोपीविरुध्द पोलीस ठाणे चामोर्शी येथे गुन्हा नोंद करून तपास केला व प्रकरण चामोर्शी येथील न्यायालयात वर्ग केला. न्यायालयात सरकारी पक्षाच्या साक्षपुराव्यावरुन आरोपीने अवैधरित्या 100 लिटर दारु बाळगल्याचे निष्पन्न झाले असता चमोर्शीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.

या कारवाईने मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे दाबे दणाणले असून आता अवैध दारू आढळून आल्यास न्यायालयीन शिक्षेला सामोरे जावे लागले अशी धास्तीही अवैध दारुविक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.