बायको प्रियकरासोबत पळाली म्हणून जावयाने सासऱ्याला घातल्या गोळ्या


महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात उघडकीला आलेली असून आपली पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून खून केलेला आहे. अंबड शहरातील शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून पंडित भानुदास काळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळावरून तीन आरोपी फरार झाल्याची देखील माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरणी मुख्य संशयित असलेला जावई किशोर शिवदास पवार यांच्यासोबत पंडित भानुदास काळे यांचे मुलगी नंदा काळे हिचा विवाह झालेला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि मुली देखील झाल्या मात्र त्यानंतर देखील त्यांचे अजिबात पटत नव्हते. काही दिवसांपूर्वी नंदा ही पाचोड येथील एका व्यक्तीसोबत पळून गेली त्यावरून किशोर पवार याने सासऱ्यांना देखील शिवीगाळ केलेली होती. माझ्या बायकोला नांदायला पाठवा नाहीतर तुम्हाला बघून घेईल असे देखील तो म्हणायचा.


घटना घडली त्यादिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास पंडित काळे आणि त्यांचा मुलगा घरी बसलेले असताना संशयित किशोर पवार, नितीन जाधव आणि आणखीन एक ईसम तिथे आले आणि त्यांनी पंडित काळे यांना मारहाण करत शिवीगाळ केली आणि कमरेची बंदूक काढत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित व्यक्तींच्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलेली आहे