वडधातील स्थिती : कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल
आरमोरी: वडधा शासकीय कार्यालयातील विविध कामे गतिमान राहावीत, असे शासनाचे निर्देश आहेत; परंतु तसे होताना दिसून येत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाही. याचा फटका लोकांना बसून त्राससुद्धा होतो. अलिकडे तर तालुका स्तरावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिटिंग बोलावली आहे. त्यामुळे आपण कार्यालयात येणार नाही, असे सांगून बहुतांश अधिकारी व कर्मचारी स्थानिक लोकांची दिशाभूल करतात. वडधा परिसरात हा प्रकार जोरात सुरू आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महिन्याला १-२ बैठका होऊ शकतात. परंतु प्रत्येक आठवड्यातून एक बैठक याप्रमाणे ४ ते ५ मिटिंग महिन्याला आहेत, असे सांगून जर अधिकारी व कर्मचारी स्थानिक लोकांची दिशाभूल करत असतील तर अशा दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. गावपातळीवर तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालये आहेत. सदर कार्यालयांमध्ये नागरिकांना विविध कामे असतात. परंतु मिटिंगच्या नावाखाली हे अधिकारी व कर्मचारी स्थानिक लोकांची दिशाभूल करतात.