अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार*


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

*अतिशय दुःखद घटना*

*दुधडेयरी-तुळशी फाट्या लगतची घटना*

*आमदार कृष्णा गजबेंनी घेतली रुग्णालयाकडे धाव*


देसाईगंज:
     तालुक्यातील आमगाव (बुट्टी) येथील रहिवासी असलेले एकाच कुटुंबातील चार जण कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा- गरगडा येथील नातेवाईकाचा दुपारी लग्न लावून परत येत असताना देसाईगंज शहरापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधडेयरी-तुळशी फाट्या लगत अचानक अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने मृतकांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेऊन घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली.
    भारत राजगडे(३५ वर्षे) पत्नी अंकिता भारत राजगडे (२९ वर्षे)तर चार वर्षीय मुलगी देवांशी व दोन वर्षीय मनस्वी असे अंगावर वीज कोसळून जागीच ठार झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी असलेले पती पत्नी आपल्या दोन चिमुकल्या अपत्यासह कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा-गरगडा येथील नातेवाईकांकडे आयोजीत लग्नाला गेले होते.लग्न कार्यक्रम आटपून स्वगावी परतीच्या मार्गांवर असताना अचानक वीजांच्या गडगटासह पाऊस सुरु झाल्याने देसाईगंज-कुरखेडा मार्गांवर असलेल्या दुधडेयरी-तुळशी फाट्या लगत आपली दुचाकी उभी करून कुटुंबा समवेत झाडाच्या आसऱ्याने उभे असता सायंकाळी ५.४० च्या सुमारास अचानक वीजेचा गडगटा होऊन वीज कुटुंबार कोसळल्याने चौघेही जागीच ठार झाले.
   ही घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. या दुःखद प्रसंगी आम्ही राजगडे कुटुंबियांच्या सोबत आहोत. राजगडे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यासाठी बळ मिळो, हीच प्रार्थना!
   भारत राजगडे हा झाडिपट्टी रंगभूमीत कार्यरत कलावंत असुन त्याने गायन या विषयात विशारद देखील केले होते.झाडिपट्टी रंगभूमीच्या पटलावर उभरता गायक कलाकार सद्या स्थितीत लग्न संभारंभ, वाढदिवस व इतरही कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजीत सुगम संगीताचे कार्यक्रम घेऊन व प्रसंगी इमारती पेंटींगची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवित होता. आई-वडिलांना एकच मुलगा असुन काही वर्षापुर्वीच वडिलाचे निधन झाल्याने ६५ वर्षीय म्हाताऱ्या आईसह कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होता. दरम्यान लग्न संभारंभ आटपून परतिच्या मार्गांवर असताना अचानक कुटुंबावरच वीज कोसळून संपुर्ण कुटुंबच जागीच ठार झाल्याने म्हाताऱ्या आईचा आधारच हरवल्याने परिवारातील सदस्य पुरते हादरले आहेत.
 दरम्यान घटनेची माहिती मिळताच व चौघांचीही प्रेतं उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळताच आमदार गजबे यांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन घटनेची माहिती जाणुन घेतली. 

यावेळी देसाईगंज नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, नायब तहसीलदार आर.डी.नैताम उपस्थित होते. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबातील चौघांनाही शवविच्छेदना करीता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचा मर्ग देसाईगंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या माग॔दश॔नात पोलिस करीत आहेत.