आपल्या बॅण्ड पथकातील मुलांचा मला अभिमान आहे - कैलाशचंद्र आर्य प्रशासकीय अधिकारी
मुलुंडमध्ये मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्नप्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई 
मुलुंड, दि. २ : मुलुंड 'टी' विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलात "इंद्रधनुष्य" कार्यक्रमात बॅण्डचे उत्तम सादरीकरण केलेल्या मुलांचा गुणगौरव सोहळा शनिवार, दि. १ एप्रिल रोजी संपन्न झाला. कोरोना कालावधीनंतर प्रथमच मुंबई महापालिकेने मुलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मुलुंड कॅम्प मराठी शाळा क्र. २, मुलुंड कॅम्प इंग्रजी व मुलुंड कॅम्प माध्यमिक इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी बॅण्डचे उत्तम सादरीकरण केले होते. त्यामुळे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. मुलांना प्रमाणपत्र, फोटो फ्रेम व नाश्ता देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मुलुंड 'टी' विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलाशचंद्र आर्य, विभाग निरिक्षिका कांचन गोसावी, कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुलुंड विभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व बहुसंख्य पालकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

प्रशासकीय अधिकारी कैलाशचंद्र आर्य यांनी सांगितले की, मुलुंड विभागाचा प्रमुख या नात्याने मला या मुलांचा अभिमान वाटतो. मी मुलांचा सराव व अंतिम कार्यक्रम पुर्ण पाहिला. मुलांनी न चुकता उत्तम सादरीकरण केले. विभाग निरिक्षिका कांचन गोसावी यांनी सांगितले की, मुलुंडमध्ये आता खरोखर सर्वोत्तम बॅण्ड पथक तयार झाले आहे.

कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, मुंबई महापालिका शारीरिक शिक्षण विभागाने ७० शिक्षकांना बॅण्डचे मागील वर्षी प्रशिक्षण दिले. प्रत्येक विभागात एक तरी बॅण्ड पथक तयार व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. एखाद्या विभागातील शाळेत जेव्हा मंत्री किंवा मोठे अधिकारी भेटीसाठी येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी इतर विभागातून बॅण्ड पथक बोलवावे लागते. परंतु आता आमच्या मुलुंड विभागात उत्तम बॅण्ड पथक तयार झाले आहे. मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मी या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. मुख्याध्यापिका रेऊ साबळे, मुख्याध्यापक मनोज पवार, विश्वनाथ गुहे व प्रशिक्षिका प्रीती पोपट यांनी याकामी उत्तम सहकार्य केले.

.


.मुलुंड कॅम्प संकुलातील शारीरिक शिक्षण शिक्षक दिलीप अहिनवे हे मागील वर्षापासून मुलांना बॅण्डचे प्रशिक्षण देत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुलुंड कॅम्प शाळा संकुलातील मुलांना इंद्रधनुष्य कार्यक्रमात बॅण्डचे सादरीकरण करण्याची संधी दिली. बॅण्ड मास्टर्स गंगाधर महाले, राजेश अवघडे, विजय पाटील व वासुदेव बजागे यांनी मुलांची महिनाभर चांगल्याप्रकारे तयारी करुन घेतली. विशेष शिक्षक यशवंत चव्हाण, सुनिल दुसारिया, अर्चना पवार, श्रीकांत शिंदे, मीना महाडिक, अनुजा दळवी, अनिल पाटील व दिपक आंब्रे यांनी मुलांच्या सरावा दरम्यान इतर तयारीसाठी खुप मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रशिक्षिका श्रध्दा काजळे यांनी तर शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक मनोज पवार यांनी मानले