गडचिरोली, : बेपत्ता पुतण्याचा मृतदेह जंगलात जळालेल्या स्थितीत आढळल्याच्या घटनेतून कुटूंब सावरले नाही तोच काकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 एप्रिल रोजी एटापल्ली येथे घडली.
उमेश लक्ष्मण उसेंडी (30) रा. एटापल्ली हा 27 मार्चला मित्राच्या आजारी आईसह अहेरी ग्रामीण रुग्णालयात गेला होता. फिट आल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातच दाखल करण्यात आले. दरम्यान, 1 एप्रिल रोजी तो दवाखान्यातून बेपत्ता झाला होता. 13 एप्रिलला रेगडी पोलिस ठाणे हद्दीतील पोतेपल्ली जंगलात त्याचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्याची हत्या झाली की नैसर्गिक मृत्यू झाला, याचे गुढ कायम असतानाच 22 एप्रिलला त्याचे काका रमेश लालसू उसेंडी ( 47 ) यांनी घरात दोरीने आड्याला गळफास घेवून आत्महत्या केली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी
करण्यात आली. पुतण्यानंतर काकाच्या जाण्याने उसेंडी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
नैराश्यामुळे गळफास घेतल्याचा अंदाज
22 एप्रिल रोजी उसेंडी कुटूंबातील इतर सदस्य रेगडी पोलिस ठाण्यात उमेश उसेंडीच्या मृत्यू प्रकरणात जबाब देण्यासाठी गेले होते. घरी मुलगा रुपेश व रमेश उसेंडी होते. रमेश यांनी रुपेशला दुचाकीमध्ये पेट्रोल भरुन आण, असे सांगून बाहेर पाठवले. घरी कुणीही नसताना त्यांनी जीवनयात्रा संपवली. मुलगा पेट्रोल भरून घरी परतला तेव्हा वडिलांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रमेश हे दोन वर्षांपूर्वी ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. दोन वर्षांपासून ते शेती करीत होते. पुतण्याच्या जाण्याने ते निराश होते. यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.