आरमोरी : दि.13 /4/2023 महाराजस्व - अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान ठरले असून खात्यांच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यासह मदतीचे वाटप करण्यात येते. सामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासकीय विभागांनी अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले.
ते आरमोरी तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील मोहझरी येथे आकाश विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाराजस्व अभियान शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी आ. आनंदराव गेडाम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य संपत आळे, विश्वास भोवते, नायब तहसीलदार संजय राठोड, नायब तहसीलदार ललीतकुमार लाडे, आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, मोहझरी ग्रा. प. चे सरपंच मयूर कोडाप, वैरागडचे पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर, मोहझरी ग्रा. पं.चे माजी सरपंच शालीकराम मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना तहसीलदार डहाट म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षम व्हावे असेही ते म्हणाले.
उदघाटक माजी आ. गेडाम म्हणाले की, शासन आपल्या दारी या माध्यमातून नागरिकांनी केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सरकारतर्फे विविध
लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमधून व्यक्तीगत लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक सशक्त बनावे. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
नेहरू युवा केंद्र गडचिरोली अंतर्गत विविध योजनांची माहिती युवा राष्ट्रिय स्वयंसेवक प्रियंका दहिकर यांनी उपस्थित नागरिकांना दिली. शिबिरात तालुक्यातील आदिवासी मुलींनी आदिवासी समूह नृत्य सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले. महाराजस्व अभियानात महसूल प्रशासन, कृषी विभाग, आरोग्य विभाग, अन्न व पुरवठा विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, प्रकल्प कार्यालय, पंचायत विभाग, सामाजिक वनीकरण, संजय गांधी निराधार, बँक तसेच कोसा प्रकल्पातील आदी विभागांनी स्टॉल लावून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संगनिकृत वनहक्क सातबारा, शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे, नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी धनादेश वाटप, रोटावेटर वाटप, दिव्यांग प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, बीपी एल, गोल्डन कार्ड, आधार कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार संजय राठोड, संचालन तलाठी संकेत काटवार तर आभार महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान यांनी मानले.
कार्यक्रमाला विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.