सोलापुरी जनतेने बैलगाडीला ५१ बैलजोड्या जुंपून काढली बाबासाहेबांची मिरवणूक! आणि बाबासाहेबांना आठवले..



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक घटना खूप हृदयद्रावक व अंगावर शहरा आणणारी आहे. बालपणी बाबासाहेब आणि त्यांची आतेभावंड रामजी बाबांना सातारा जिल्ह्यातील नोकरीच्या ठिकाणी भेटण्यासाठी निघाली होती. रेल्वेने मसूर स्टेशन पर्यंत पोहोचली तेथे उतरली तर अंधार झाला होता. रामजी बाबा आपल्याला घ्यायला कोणाला तर पाठवतील असं छोट्या भीमरावाला वाटत होत. पण उतरून बराच वेळ झाला तरी स्टेशनवर त्यांना घ्यायला कोणीच आलेल नव्हत. आता मात्र बाबासाहेब आणि त्यांच्या भावंडांना काळजी वाटायला लागली. तेव्हा स्टेशन मास्तराने कुठे जायचं हे विचारून एक बैलगाडीवाला त्या पोरांना मिळवून दिला. बाबासाहेब आणि त्यांची भावंड चांगली टापटीप, व्यवस्थित कपडे घातलेले असल्यामुळे ते अस्पृश्य असतील असे सुरुवातीला बैलगाडीवाला व इतरांना वाटले नाही. रात्रीचा अंधार वाढत चालला होता गाडी बैलगाडी अंधाराला चिरत काटेरी, झाडाझुडपांच्या वाटेतून निघालेली होती. बाबासाहेब आणि त्यांच्या भावंडाकडे पिशवीत खाण्यासाठी आणलेल्या काही गोष्टी होत्या. पण प्यायला पाणीच नव्हतं, घशाला तर कोरड पडलेली त्यामुळे काही खाणं अशक्य झालं होतं पोटात कावळे ओरडत होते. तेवढ्यात बोलता बोलता "आम्ही अस्पृश्य महार आहोत" असं त्या गाडीवानाला बाबासाहेब बोलून गेले, आणि झालं..! गाडीवान शिव्या देत, ओरडत बैलगाडीतून खाली उतरला. मी गाडी घेऊन पुढे जाणार नाही.. महारांनो तुम्ही माझी बैलगाडी बाटवली.. असं म्हणत तो या चिमुकल्या मुलांवर ओरडायला लागला. रात्रीचा भयान अंधार, त्या भयान अंधारात आता आपलं काय होणार? या भीतीने बाबासाहेब आणि त्यांची भावंड घाबरली, तरीही बाबासाहेब धैर्य करून त्या गाडीवानाला बोलत होते. बाबासाहेबांनी त्याला पैशाच आमिष दाखवलं, की ठरलेल्या गाडी भाड्याच्या दुप्पट पैसे आम्ही तुम्हाला देऊ, असं बाबासाहेब त्याला बोलले आणि मग दुप्पट भाडे व एका अटीवर तो तयार झाला. तो म्हणाला मी बैलगाडीच्या पाठीमागून चालणार, बैलगाडीचा कासरा तुम्हीच घेऊन बसायचं, कसं का होईना बैलगाडीतून आपल्याला जायला मिळते, हा धीर दिलासा बाबासाहेबांना आणि चिमुकल्या भावांना मिळाला आणि ते तयार झाले, रात्रीचा किर्र अंधारात सुरू असणारा तो प्रवास खूप भीतीदायक होताच, पण जात समजल्यान एक नवीन समस्या बाबासाहेब अनुभवत होते. पोटात कावळे ओरडत होते आणि घशाला कोरड पडली होती. पण गाडीवान कसलीही मदत करायला तयार नव्हता... ती अख्खी रात्र बाबासाहेब आणि चिमुकल्या भावंडांनी उपाशी आणि पाण्याविना काढली ती वेदना, तो बैलगाडीचा भयाण अन्न पाण्याविना केलेला, जातीय चटके देणारा, किर्र अंधारतील जीवघेणा प्रवास बाबासाहेब विसरले नव्हते.
पण सोलापूरकर जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील जनतेने मात्र बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करून बाबासाहेबांची मिरवणूक 51 बैलजोड्या बैलगाडीला जुंपून त्या बैलगाडीतून काढली... तो इतिहासात कोरून ठेवावा असा प्रसंग..

बाबासाहेबांनी हैदराबाद संस्थानात अस्पृश्यांवर होणारे अनन्वित अत्याचार व निजामाची हुकूमशाही या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य व इतर सर्व समाजांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी बाबासाहेबांनी जनजागृती सुरू केली त्यामुळे हादरून गेलेल्या निजामाने बाबासाहेबांना हैदराबाद संस्थानात येण्यास बंदी घातली.

निजामाच्या या हुकूमशाही विरोधात व त्याच्या अनन्वित अत्याचारांविरोधात रान पेटवण्यासाठी बाबासाहेबांनी हैदराबाद संस्थानाच्या सिमे जवळच्या भागात सभा घेण्यास सुरुवात केली व त्यातूनच बाबासाहेबांनी जळगाव जिल्ह्यातील मकरानपुर हे गाव निवडले व तेथे परिषद घेतली. मकरानपुर हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या लगत असल्याने हैदराबाद संस्थानातील नागरिकांना या परिषदेला येणे सोयीचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी हैदराबाद संस्थानाची दुसरी बाजू असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेजवळ परिषद घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी बाबासाहेबांनी निवड केली ते गाव होते सोलापूर जिल्ह्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असणारे कसबे तडवळे गाव!

बाबासाहेबांचे जुने सहकारी हरिभाऊ तोरणे हे या कसबे तडवळे गावात शिक्षक म्हणून होते त्यामुळे या गावाशी त्यांचा जवळचा संबंध होता. सारे लोक तोरणे मास्तरांना मानत असत, तसेच आमदार जिवाप्पा ऐदाळे यांनीही हे गाव योग्य असल्याबाबत बाबासाहेबांना होकार दिला.
आजूबाजूच्या परिसराचा विचार करता कसबे तडवळे हे गाव उस्मानाबादच्या सीमेवर असल्यामुळे नांदेड, बीड इथपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, पारगाव, वाशी, सरमकुंडी, इंदापूर, तारखेडा, बावी , येरमाळा,मस्सा, दहिफळ, मांडवा, मोहा, खामसवाडी, तांदुळवाडी , बिगसळवाडी, शिराढोण, मंगळूर, जवळा, देवळाली, ढोकी , ढोराळा, रत्नपुर, शेलगाव, हळदगाव चोराखळी, उस्मानाबाद बेंबळी अशा हैदराबाद संस्थान इलाख्यातील गावात तर बार्शी, वैराग, पानगाव, पांगरी, येडशी, शेलगाव, वाघोली,हळदगाव पांगरी , चिराडे कारणारी हे इंग्रजी सत्ता असणाऱ्या गावात परिषदेचा प्रभाव होणार होता.
याची जाणीव आयोजकांना व बाबासाहेबांना होती म्हणून कसबे तडवळे हे गाव सर्वांना परिषदेसाठी योग्य वाटले.
सोलापूर जिल्ह्यातील या कसबे तडवळे गावी परिषदेसाठी बाबासाहेबांनी 22 व 23 फेब्रुवारी 1941 हे दिवस मुकर्रार केले. या परिषदेबाबत बाबासाहेबांनी एक सामाजिक सालोख्याचा सामाजिक ऐक्याचा निर्णय घेतल्याचा व त्याचे दुर्गामी परिणाम होतील याकडे लक्ष दिल्याची गोष्ट दिसून येते. या परिषदेला केवळ महार परिषद न म्हणता बाबासाहेब म्हणाले "कसबे तडवळे येथील परिषद ही महार मांग वतनदार परिषद" असेल. बाबासाहेबांनी आ.जिवाप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे मास्तर भगवान भालेराव, विठ्ठल बनसोडे आदी मंडळींना परिषदेची तयारी करण्यासाठी फेब्रुवारीला मी येत आहे असे आश्वासन दिले. बाबासाहेब स्वतः सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्या गावी येत आहेत या गोष्टीनेच कार्यकर्ते हरकले, त्यांच्यात अमाप उत्साह संचारला.

मुंबईवरून आल्यावर तडवळे येथे कार्यकर्त्यांनी परिषदेच्या तयारी बाबत एका बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीत आमदार जिवापा येत आहे हरिभाऊ तोरणे मास्तर भगवान भालेराव आदींनी परिषदेची भूमिका सर्व उपस्थित त्यांना समजावून सांगितली. परिषदेचा जास्तीत जास्त प्रचार करावा, प्रत्येकापर्यंत ही वार्ता व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जास्तीत जास्त लोक परिषदेला कशी येतील याविषयी नियोजन करावे, याविषयी आवाहन आमदार जिवाप्पा ऐदाळे यांनी केले. परिषदेची पत्रके तयार करून ती आजूबाजूच्या गावात वस्ती वस्तीत घराघरात वाटावी असे ठरले व ती पत्रके वाटण्याची जबाबदारी भगवान भालेराव आणि सदाशिव भालेराव यांना देण्यात आली. खरंतर त्या बैठकीमध्ये एक प्रचंड जोश होता. आपले उद्धारक , देशाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतः आपल्या गावात येणार.. ही गोष्टच त्या सर्व लोकांना बळ देणारी, उत्साह देणारी होती. सगळेजण हरकून गेले होते. त्यांना यावर कसा विश्वास ठेवावा ते कळत नव्हतं. आपल्या तडवळे सारख्या एका खेड्या गावात बाबासाहेब स्वतः येणार तेही दोन दिवस म्हणजे एक मुक्कामी येणार.. काय करावं आणि काय करू नये? असं सगळ्यांना झालं होतं.

बैठकीत नंतर प्रत्यक्ष नियोजन सुरू झाल. प्रत्येकजण उत्साहाने आपापले योजना सांगत होता. बाबासाहेब येणार आहेत तर असं करू.. बाबासाहेब येणार आहेत तर तसं करू.. बाबासाहेबांचे स्वागत आपण असं जंगी स्वागत करू.. सगळेजण आपापसातले मतभेद विसरून आपल्या मुक्तिदात्याच्या स्वागताला सज्ज होण्याच्या तयारीला लागले होते आणि भूमिका मांडत होते.
सभा घ्यायची, परिषद होणार म्हणजे स्टेज पाहिजे, मंडप पाहिजे स्पीकर पाहिजे, रंगीत झालर , कापड पाहिजे, खुर्च्या पाहिजे, टेबल पाहिजेत, रंगबिरंगी पडदे असले पाहिजेत, स्टेजवर गाद्या असल्या पाहिजेत, अशा एक ना अनेक सूचना सगळे मांडत होते. सूचना सर्वांनी सांगून झाल्या सर्वांनी बोलून झाल्यावर सर्वत्र शांतता पसरली. कारण या सगळ्या वस्तू, ज्यांची नावे घेतली गेली होती यातली कोणतीच गोष्ट त्या तडवळे गावात उपलब्ध नव्हती. महारवाड्यात तर यातलं काही असण्याचा प्रश्नच नव्हता. आता हे सगळं आणायचं तर कुठून आणायचं? कसं आणायचं? हा प्रश्न सर्वांपुढे उभा होता.
पण, अरे आपले मुक्तिदाता बाबासाहेब येत आहेत आणि त्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला ज्या गोष्टी नाहीत ना, त्या गोष्टी आपण निर्माण करू हा आत्मविश्वास तेथील प्रत्येकात होता. ती भावना त्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतील आणि उत्तर सापडली.
 स्टेज नाही ना.. मग मोठमोठाले दगड धोंडे आणले गेले, वस्तीवरील मैदानात दगड धोंडे माती घालून एक भरभक्कम स्टेज बांधला गेला. त्या स्टेजच्या चारी कोपऱ्यावर रानातली चांगली वाळलेली झाडे तोडून त्याच्या दांड्या उभ्या केल्या गेल्या. त्याला आधार देणाऱ्या दांड्या लावल्या गेल्या. स्टेज वरती मांडव घालावा . तशा दांड्या बांधल्या त्याच्यावर मंडपाचे कापड नाहीये ना.. तर थेट पत्रे आणून स्टेजवर मंडप तयार झाला. आता हे सुंदर सजवलं पाहिजे. मग राणावनात जाऊन अनेक कार्यकर्त्यांनी केळीची खुंट तोडून आणली. स्टेजच्या बाजूला असलेल्या दांड्याना केळीची खुंट्या बांधल्या. रंगीत कापड आणून, दांड्या सजवल्या गेल्या, केळीची खुंट बांधून त्याच्याकडेने आंब्याची तोरण लावली. सभोवतालचा परिसर सजवला गेला आणि बघता बघता परिषदेसाठीचा मंडप तयार झाला. सुंदर देखना आपल्या कष्टातून आपल्या महामानवाच्या स्वागतासाठी आपण देखणा मंडप उभारला. सगळी व्यवस्था करतोय याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर व सांडून वाहत होता.
समाजातील सगळ्यांचीच 

घरही शेनामातीची, घरावर छप्पर.. वारं आलं तर माती घरात शिरावी, पाऊस आला तर पाण्याचा लोंढा घरात यावा, अशी साऱ्यांची घर! त्या घरात मातीची भांडी, मातीची चूल एखाद्याच्या घरात जर्मन ची भांडी असायची. मग आता आपले बाबासाहेब आल्यावर त्यांना जेवण कशात वाढायचं? हा प्रश्न निर्माण झाला आणि सगळेच विचार करायला लागले. आपले संसार तर तोडके मोडके आपल्या उद्धारकर्त्याला जेवायला कशात वाढायचं? आपल्याकडे भांडी नाहीत. सगळे विचार करत असताना त्यावर एकाने उत्तर सुचवलं.. हैदराबादहून भांडी मागवायची, आपले अनेक मंडळी रेल्वेत नोकरीला आहेत. ते हे काम करतील. हैदराबादहून दोन दिवसासाठी भांडी आणतील, रेल्वेत साफसफाई वगैरे कामाला असलेल्या बांधवांनी आनंदाने ते काम स्वीकारलं आणि खरा प्रश्न पुढे उभा राहिला तो एकाने उपस्थित केला तो म्हणाला बाबासाहेब तर मुक्कामी येणार आहेत, बाबासाहेब मुक्काम करणार कुठे? आपली घरं तर अशी मोडकी तोडकी! आपल्या घरात फाटकी गोधडी, तुटकी भांडी! बाबासाहेबांसाठी मुक्कामाची सोय कशी करायची? याचे उत्तर मात्र अवघड होते. कारण गावातील सवर्णांची घर मिळण तर अशक्य होतं, दलितांच्या पुढाऱ्याला कोण आश्रय देतो.. हा प्रश्न निर्माण झाला आणि साऱ्यांचेच चेहरे उतरले! तेवढ्यात हरिभाऊ तोरणे मास्तरांनी एक उपाय सुचवला आयुष्यभर शाळेत रमलेले गुरुजी म्हणाले, आपल्या गावात जी लोकल बोर्डाची शाळा आहे त्या शाळेचा एक वर्ग आपण नीटनेटका करून आणि त्या वर्गात बाबासाहेबांच्या मुक्कामाची सोय करू, खरंतर त्या काळात लोकल बोर्डाच्या शाळा म्हणजे मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या तुटकी फुटकी खिडकी, कुजलेले पत्रे, खाली सारवण केलेल्या, भिंती ढासळायला लागलेल्या अशा शाळा असायच्या. पण आता बाबासाहेबांना मुक्कामाची व्यवस्था करण्याची दुसरी कोणतीच पर्यायी सोय नसल्याने सर्वांना तोरणे मास्तरांनी सांगितलेला शाळेचा उपाय मान्य करावा लागला.
 सर्वांनी ती शाळा स्वच्छ करण्यासाठी भालेराव गुरुजी आणि काही तरुणांवर जबाबदारी दिली. शाळेचे वर्ग, दारे, खिडक्या, छत यांची साफसफाई स्वच्छता करण्यात आली. खिडक्यांना घरातील धोतर कपडे आणून पडदे लावण्यात आले. जमीन सारवण्यात आली. दोन खुर्च्या व्यवस्थित ठेवण्यात आल्या. स्वतः आमदार ऐदाळे या सर्व गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत होते. आता बाबासाहेबांची व्यवस्था ज्या वर्गात खोलीत करण्यात आली होती त्या वर्ग खोलीच्या आजूबाजूंनी परिसरात काही स्वयंसेवकांची संरक्षणासाठी निवड करण्यात आली. त्यांनी त्या ठिकाणी पहारा द्यायचा असं ठरवण्यात आलं. त्या तरुण कार्यकर्त्यांना कामे वाटून देण्यात आली. बाबासाहेबांच्या सुरक्षिततेकडे आमदार जीवाप ऐदाळे यांनी विशेष लक्ष दिले. वर्गाबरोबरच त्यांनी आजूबाजूच्या परिसराची ही पाहणी केली. कोणताही धोका पत्करणे खूप महागात पडणारे असू शकते, याची त्यांना जाणीव होती. ते प्रत्येक गोष्ट पारखून निरखून घेत होते.

बाबासाहेबांच्या आगमनाची अशी सगळी व्यवस्था होत असताना पुन्हा बैठक बसली आणि त्यात सर्वांनी एक मागणी केली की बाबासाहेब आल्यानंतर त्यांचं रेल्वे स्टेशन पासून परिषदेच्या ठिकाणापर्यंत जंगी मिरवणूक काढून स्वागत करायचं. तर बाबासाहेबांची मिरवणूक काढायची यावर सगळ्यांचा क्षणात होकार आला. पण मिरवणूक काढायची कशी? बाबासाहेब स्वतः येणार रेल्वेने त्यामुळे त्यांची गाडी नसणार.. आपल्याकडे तर कोणाकडेच गाडी नाही, रथ नाही किंवा गाडी आणि रथ कोणाकडे मागितला तर तो मिळेल का? मग कशी मिरवणूक काढायची? हा प्रश्न निर्माण झाला आणि सगळे चिंताग्रस्त झाले. सगळे शांत बसलेले असतानाच एक कार्यकर्ता तडफेणे उभा राहिला आणि उत्स्फूर्तपणे बोलला आपण आपल्या "बाबासाहेबांची मिरवणूक बैलगाडीतून काढू" तो तसा बैलगाडीतून शब्द उच्चारला तसं इतर वरिष्ठ कार्यकर्ते त्याच्यावर ओरडले.. अरे या देशाचे नेते, आपले उद्धारक, भले भले ज्यांना सलाम करतात त्या आपल्या मुक्तिदात्याला बैलगाडीतून आणायचं? कसं वाटेल त्यांना बैलगाडीतून आणलं तर त्यांचा अपमान होईल.. त्यांना बैलगाडीतून आणावं तर वाट नीट नाही, वाटेत खड्डे खाचखळगे आहेत. त्यांना त्रास होईल बैलगाडीतून येताना. त्यामुळे बैलगाडीत नको असे काही जण बोलले.

पण हे सगळं बोलत असताना आता बैलगाडी शिवाय आपल्याकडे इतर कोणता पर्याय नाही, याचीही जाणीव सर्वांना होत होती.
बाबासाहेबांच्या आगमनाची तयारी करणारे हे सगळे अस्पृश्य कार्यकर्ते गावातील पाटलाच्या, खोताच्या, देशमुखाच्या वाड्यावर, शेतावर राबणारे, त्यांच्या बैलगाड्या हाकणारे, मजूर होते. त्यांचे सालगडी होते. ही सगळी चर्चा चालू असताना त्यातील एक जण उभा राहिला आणि त्याने एक कल्पना सुचवली. आपल्या बाबासाहेबांची मिरवणूक आपण त्या बैलगाडीला 51 बैलजोड्या जुंपून काढायची का? त्यांनी जशी ही कल्पना मांडली तशी ही वेगळी कल्पना.. सर्वांनाच आवडली सर्वांनी त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलं, कौतुक केलं. 
पण तेवढ्यात एक कार्यकर्ता उभा राहिला आणि त्याच्या प्रश्नांना पुन्हा सगळेजण शांत झाले आणि विचारात पडले. बैलगाडीने बाबासाहेबांची मिरवणूक काढायची त्याला 51 बैलजोड्या जुम्पायचे हे खर आहे , पण आपल्या कोणाकडेच बैलगाडी किंवा बैल नाहीत, हे कुठून आणायचं सगळं ! हा त्याचा प्रश्न होता आणि सर्वांची तोंड आता बंद झाले होते. यातील सगळेच कार्यकर्ते कोणाच्या ना कोणाच्या शेतावर बैलगाडी हाकणारे मजुरी करणारे होते, तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या मालकाला मिरवणुकीसाठी बैल देण्याबाबत गळ घालायची आणि बैलगाडी गावातील श्री गणेश लालजी डाळे या मारवाडी इसमाकडे मागून पाहायची असे ठरले. मिरवणुकीबाबत इतर चर्चा व परिषदेचे नियोजन झाले. सारे कार्यकर्ते गणेश लालजी डाळे यांना जावून भेटले आणि त्यांना सांगितलं बाबासाहेबांची मिरवणूक स्टेशन पासून ते परिषदेच्या ठिकाणापर्यंत काढायची, त्यासाठी आम्हाला तुमची बैलगाडी हवी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय. आता आपल्याकडेच काम करणारे, रोजंदारीवर असणारे माणसं काहीतरी विनंती करतात, यांना कस नाराज करायच, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला व शेवटी गणेश लालजी डाळे यांनी बैलगाडी देण्यास होकार दिला. ते म्हणाले "देशातील मोठे नेते दलितोधारक बाबासाहेब आपल्या गावात येत आहेत, आणि तुम्ही सगळे त्यांच्यावर इतकं मनापासून प्रेम करतात, तुमच्या या परिषदेला माझं हे सहकार्य म्हणून तुम्ही माझी गाडी बैलगाडी आणि बैल ही घेऊन जा" अशी डाळे यांनी मान्यता दिली आणि बैलगाडीची आणि दोन बैलांची सोय झाली. आता इतर बैले जमा करणं हे खरं आव्हान होतं, तर सर्वांनी गावातील ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांच्याकडे आपण मजुरीला जातो, त्यांना बैलांबाबत विचारणा केली व बैल देण्याबाबत गळ घातली. तसं पाहिलं तर कसबे तडवळे हे गाव एकोपा असणारे गाव होतं. गावात सगळेजण गुण्यागोविंदाने राहत होते. त्याच गावात हरिभाऊ तोरणे मास्तरांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये समतेचा, एकोप्याचा संदेश पेरलेला होता. ते त्यांना कायम महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार सांगत असत. त्यांची समता शिकवत. बाबासाहेबांचे क्रांतिकार्य गावातील नागरिकांना सांगत असत. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल गावकऱ्यांच्या मनात चांगली भावना होती.
 त्यामुळे आपल्याकडे आलेल्या आपल्याच मजुरांनी मागणी केलेल्या काही तासांसाठीच्या बैलांच्या मागणीला अनेकांनी होकार दिला आणि बैलगाडी साठी लागणाऱ्या 51 बैलजोड्यांची जुळवाजुळव झाली. आमदार जिवापा यादाळे हरिभाऊ तोरणे बाबासाहेब यांना आणण्यासाठी मुंबईला गेले.

तिकडे कार्यकर्त्यांनी डाळे यांचे बैलगाडी बाहेर काढली आणि बैलगाडी सजवण्याचे काम सुरू झालं. बैलगाडीला रंग देण्यात आला. रंगीबेरंगी पानाफुलांनी बैलगाडी सजवली गेली. बैलगाडीला फुलांचा माळा घालण्यात आल्या. बैलांच्या पाठीवर झुली टाकण्यात आल्या. शिंगे रंगवली, गळ्यात चंगाळी बांधली, सारा माहोल बदलला. आमदार जिवाप्प ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, भालेराव सोनवणे यांनी परिषदेची चोख व्यवस्था केल्याची पाहणी केली. बाबासाहेबांच्या निवासस्थानाची व्यवस्थित पाहणी केली. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत की नाही याची पाहणी केली. 

अखेर बाबासाहेब येण्याचा दिवस उगवला सगळीकडे आनंदी आनंद साजरा होत होता. सगळीकडे उत्साहाला भरते आलं होतं. वेळ जशी जवळ येत होती तस तशी गर्दी जमा होत होती. 22 फेब्रुवारी चा दिवस, रेल्वेची वेळ ठरलेली होती, गर्दी तडवळे स्टेशन कडे कुच करत होती, तरुणांमध्ये उत्साह संचारला होता. सारा गाव बाबासाहेबांच्या स्वागतासाठी तयार झाला होता. हलगी, तुतारी, लेझीम, ढोल अशी सारी स्वागताची जय्यत तयारी करून सारी मंडळी तडवळे ढोकी कळम रोड रेल्वे स्टेशनच्या परिसरात जमले होते. सारे जण वाट पाहत होते आपला मुक्तिदाता येण्याची बाबासाहेब येणार.. या विचाराने सारे जण उत्साही झाले होते. ठीक 12 वाजले स्टेशनवरील घड्याळात बाराचे ठोके पडत होते आणि बार्शी लाईट रेल्वे गाडी स्टेशनात आली. गाडी जशी स्टेशनात आली तशी सारी जनता, सारी गर्दी बेभान झाली बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष सुरू झाला, घोषणांचा आणि सनई, तुतारी , ढोल लेझीम आवाज गगनाला भिडला. सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.. बाबासाहेब कोण आहेत, दलितांचे राजा आहेत ." अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन गेला 
प्रत्येकाचे रक्त सळसळत होतं , आपला मुक्तिदाता देशातील महान प्रकांड पंडित, राष्ट्रपुरुष , कायदे पंडित, दलितोद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या गावच्या धरतीवर येत आहे. हा विचारच प्रत्येकाला वेड लावत होता. घोषणांनी आसमंत निनादला होता. इतक्यात त्या रेल्वेच्या डब्यातून एक भारदस्त व्यक्तिमत्व प्लॅटफॉर्मवर उतरले, गौरवर्ण, विशाल कपाळ, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेच तेज, करारी नजर, प्रत्येक पावलात विश्वास, उरात स्वाभिमान अशा रुबाबदार बाबासाहेबांना पाहून उत्साहाला भरतं आलं. सारे जण बाबासाहेबांच्या जवळ जाण्यासाठी, त्यांना हार घालण्यासाठी, त्यांना स्पर्श करण्यासाठी, त्यांचा दर्शन घेण्यासाठी, धडपडू लागले. सर्वांची झुंबड उडाली, अनेक जण जागेवरूनच बाबासाहेबांकडे बघून दोन्ही हात जोडून आभाळाकडे पाहू लागले. अनेकांच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली. सुटबुट टाई कोटातले बाबासाहेब साऱ्या गर्दीत कुठून दिसत होते. ते राजबिंडे व्यक्तिमत्व, त्यांच्या दर्शनाने अनेकांना आपल्या पिढ्यांचा उद्धार झाल्यासारखं वाटत होतं. सारे जण जिथे आहे तिथूनच नतमस्तक होत होते. आपला भाग्यविधाता आपले उद्धारकर्ते , आज साक्षात आपल्यासमोर आहेत.. यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. कसं व्यक्त व्हावं हे त्यांना कळत नव्हतं आणि अनेकांच्या डोळ्यातील आसवं घळाघळा ओघळत होती. अनेक जण मातीला स्पर्श करून ती माती कपाळाला लावत होते. बाबासाहेबांची पावलं स्टेशनच्या बाहेर मातीत पडायला लागली. 

बाबासाहेबांना आणखीन माहित नव्हतं की येथून पुढे आपली व्यवस्था काय आहे. इतक्यात बाबासाहेबांना बैलगाडीकडे नेण्यात आलं. आणि सूट बूट घातलेले बाबासाहेबांना उंच असणाऱ्या बैलगाडीत चढण थोड अवघड वाटायला लागलं. त्यामुळे बाबासाहेब थोडे अडखळल्यासारखे झाले. हे तेथे असणाऱ्या तरण्याबांड पोरांच्या लक्षात आलं, तशी एक नाही दोन-चार पोरं पुढं आली. आणि बाबासाहेबां समोर गाडीचा मागच्या बाजूला त्या पोरांनी गुडघ्यावर वाकून आपले कोपर जमिनीला टेकले आणि बाबासाहेबांना आपल्या पाठीवर पाय देऊन बैलगाडीत जाण्याची विनंती केली. कोणता प्रेम होत हे.. काय नातं होतं त्यांचं बाबासाहेबांशी.. कोणत्या विश्वासाने आपला जीव बाबासाहेबांवर ओवाळून टाकत होती ही सगळी माणसं.. बाबासाहेबांचे मन भरून आलं! धडपडणाऱ्या त्या पोरांना बाबासाहेबांनी हाताने उभा रहा असं सांगत त्यांना उभं केलं. पाठीवर हात थोपटत, अरे पोरांनो असं झुकायचं नाही.. असं वाकायचं नाही.. सांगितलं आणि बाजूला उभा केलं. त्या पोरांना आपल्या मुक्तिदात्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला स्पर्श केला, आपल्या पाठीवर पाय देण्यास नकार दिला, आपली काळजी घेतली.. ही गोष्ट त्यांच्या हृदयाचा ठाव घेणारी होती. बाबासाहेबांनी आपल्याला स्पर्श केला या भावनेनेच त्यांना आभाळ ठेंगणं झालं. आनंदाने ती पोरं वेडीपिशी झाली आणि ती पोरं रडायला लागली.. कोण आनंद झाला होता त्यांना.. की बाबासाहेबांनी आपल्याला काहीतरी सांगितलं, प्रेमाने स्पर्श केला.

 इतक्यात बाजूला उभे असणाऱ्या दोन-तीन पोरांनी भले मोठमोठे दगड उचलून आणले आणि बैलगाडीच्या बाजूला ते ठेवले त्या दगडांच्या पायऱ्या तयार झाल्या बाबासाहेबांनी त्या दगडांवर पाय दिला आणि बाबासाहेब बैलगाडीत चढले बैलगाडीत पुढच्या बाजूला दोन फळ्या टाकल्या होत्या त्या फळ्यांवरती रग अंथरला होता. बाबासाहेबांना त्यावर बसण्यासाठी सांगण्यात आलं, बाबासाहेब त्यावर बसले. 

वर बसलेले बाबासाहेब एखाद्या राजासारखे भासत होते आणि सारे जनता बैलगाडीच्या पुढे मागे बाबासाहेबांचा मोठमोठ्याने जयजयकार करत घोषणा देत चालत होती. त्या घोषणा असमंथात दुमदुमत होत्या. "बाबासाहेब कोण आहेत दलितांचा राजा आहे" "बोलो भीम भगवान की जय" अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. बैलगाडी चालायला लागली बाबासाहेबांनी पुढे पाहिलं बैलगाडीच्या पुढे दोन नव्हे तर 51 बैलजोड्यांची रांग लागली होती आणि त्या बैलांच्या पुढे वाजंत्री होते. सनई चौघडे होते ढोल ताशा निनादत होते. त्याच्यापुढे तर पोरं लेझीम खेळत होती, रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोकांनी बाबासाहेबांना पाहण्यासाठी, बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती आणि बाबासाहेबांची मिरवणूक निघाली होती. बाबासाहेबांना ती बैलगाडीच्या पुढे असणारी बैलांची रांग.. जीव ओवाळून टाकणारी पोर.. कार्यकर्ते आणि बैलगाडीत बसलेलो आपण.. हे सार पाहून बाबासाहेबांचा उर भरून आला.. आणि नकळत बाबासाहेबांच्या डोळ्यात आसवंदाटली.. का दाटली बाबासाहेबांच्या डोळ्यात आसवं?
बाबासाहेबांच्या नजरेसमोर त्यांचा भूतकाळ उभा राहिला होता क्षणात बाबासाहेब आपल्या भूतकाळात हरवले होते. 
फक्त 40 वर्षाआधी बालपणी जात कळली आणि गाडीवानाने भररात्री आपल्याला गाडीतून खाली उतरवले..

संपूर्ण लेख, पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात नक्की वाचा वतनदार परिषदेत बाबासाहेबांनी एक दीड तासाचे भाषण केलं