गुंगीचं औषध देऊन पाच कोरियन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचा उद्योजक बालेश धनखर याला अटकBalesh Dhankhar arrested : अंमली पदार्थ देऊन पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चा नेता व प्रसिद्ध उद्योजक बालेश धनखर याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं असून सिडनी शहराच्या अलीकडच्या इतिहासातील ‘सर्वात निर्दयी बलात्कारी’ असं न्यायालयानं त्याचं वर्णन केल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे.बालेश हा भाजपचा कार्यकर्ता असून तो ऑस्ट्रेलियातील 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी' संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राहिला आहे. डेटा तज्ञ म्हणूनही तो काम करतो. २०१४ साली पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी सिडनीत पंतप्रधान मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात त्याचा पुढाकार होता. पंतप्रधानांशी आपली जवळीक असल्याचं तो सांगायचा. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचे फोटोही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले होते.


दोषी ठरवताच ढसाढसा रडला!
बालेश धनखर याला सिडनीच्या डाऊनिंग सेंटरमधील जिल्हा न्यायालयानं एकूण ३९ आरोपांमध्ये दोषी ठरवलं आहे. कोर्टानं दोषी ठरवताच तो ढसाढसा रडू लागला. त्याच्या वकिलांनी जामिनासाठी केलेली विनंती न्यायालयानं फेटाळून लावली. त्यानंतर त्याला अटक करून नेण्यात आलं.

महिलांच्या लैंगिक छळाचे रेकॉर्डिंग
'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या ऑस्ट्रेलियनं दैनिकातील वृत्तानुसार, कोरियन-इंग्लिश बोलणाऱ्या महिला नोकरीसाठी हव्यात अशी जाहिरातही त्यानं दिली होती. त्याच्या घराजवळ असलेल्या सिडनीतील हिल्टन हॉटेल बार या हॉटेलात तो अधूनमधून महिलांना भेटायचा.

बालेशनं पाच कोरियन महिलांना जाळ्यात ओढून त्यांना ड्रग पाजलं. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याच्या पलंगाजवळील अलार्म घड्याळ आणि फोनवरील छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीनं महिलांच्या लैंगिक अत्याचाराचं रेकॉर्डिंगही त्यानं केलं होतं. त्यातही त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. २०१८ मध्ये पोलिसांना धनखरचे इतर महिलांसोबतचे डझनभर व्हिडिओ मिळाले होते.