पोलीस नक्षली चकमकीत एक ठार तर दोन अटकेत


बिजापूर, 18 एप्रिल : जिल्ह्यातील कचलावारी भागात पोलिस - नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षली ठार झाला असून एका जखमीसह दोन नक्षल्यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलीची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र कोअर भागात झालेल्या या चकमकनंतर जवानांकडून परिसरात सतत शोध सुरु आहे.

बिजापूर जिल्ह्यातील नायमेद पोलीस स्टेशन हद्दीतील कचलावरी भागात नक्षली असल्याची माहिती मिळाली असता मंगळवारी पहाटे डीआरजी जवानांनी शोधमोहीम राबविली असता घातपात करण्याच्या बेताने आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान जवानांनी

प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली घटनास्थळावरुन पळून गेले. जवानांनी परिसरात शोध घेतला असता एका पुरुष नक्षलीचा मृतदेह आढळला तर एका नक्षलीच्या पायात गोळी लागली ज्यात तो जखमी झाला. तसेच घटनास्थळावरुन पळून गेलेल्या आणखी एका नक्षलीला जवानांनी वेढा घालत अटक केली.

एकंदरीत या चकमकीत एक नक्षली ठार तर दोघांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत जवानांना कोणतीही हानी झाली नसून घटनास्थळी झडती घेत असताना नक्षल्यांचे दैनंदिन सामान आणि स्फोटकेही जवानांच्या पथकाने जप्त केल्याचे कळते.