भाकरोंडी येथे आज मिळणार दाखले

 आरमोरी: मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण योजनेअंतर्गत तहसील कार्यालय आरमोरी यांच्या वतीने १८ एप्रिल रोजी तालुक्यातील भाकरोंडी येथे महाराजस्व अभियान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ नागरिक, शेतमजुरांना देण्यात येणार आहे.

शासकीय योजनांची जत्रा या शीर्षकाखाली महाराजस्व अभियान २०२३ आयोजित करण्यात आले आहे. भाकरोंडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे राहणार आहेत. यामध्ये संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुधन विभाग, पंचायत समिती विभाग, आधार केंद्र यांचे स्टॉल लावून त्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय रेशन कार्ड तयार करणे, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र तयार करणे, वनहक्क संगणकीकरण ७/१२ चे वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, आधार कार्ड अद्ययावत करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.