खाजगी डॉक्टरवर सुरीने हल्ला


कोरची, 15 एप्रिल : उभ्या असलेल्या इसमावर अचानकपणे दुसऱ्या इसमाने सुरीने प्राणघातक हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना कोरची तालुक्यातील कोटगुल येथे शनिवार 15 एप्रिल रोजी घडली. संजय सुभोध बिस्वास (अंदाजे वय 38) रा. कोटगुल असे गंभीर जखमी असलेल्या इसमाचे नाव आहे तर माणिक काटेंगे रा.कोटगुल असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोटगुल येथे शनिवारी संजय बिस्वास हे उभे होते दरम्यान माणिक काटेंगे याने त्यांच्यावर अचानकपणे सुरीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बिस्वास यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने कोटगुल येथे प्रथमोपचार करुन गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडचिरोली येथे उपचाराकरिता दाखल केले असता उपचार करण्यात आले मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने व प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी माणिक काटेंगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बातमी लिहेस्तव कारवाई सुरु होती. सदर हल्ला का करण्यात आला याबाबत नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास कोटगुल पोलीस करीत आहे.