जेवणाच्या कार्यक्रमातून निघून गेला अन् गळफास घेतलाएटापल्ली : 

नातेवाइकाच्या लग्नानंतरच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून एक जण निघून गेला व सीताफळाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील जीवनगट्टा येथे ३१ मार्च रोजी रात्री घडली.

इंदरशाई बक्का आलाम (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो जीवनगट्टा येथे घरजावई म्हणून २७ वर्षांपासून राहतो. शेती व मजुरीकामे करायचा. त्यास मूलबाळ नाही. दरम्यान, ३१ मार्चला तेलंगणा राज्यातून मिरची तोडणीचे काम करून

सायंकाळी तो घरी परतला. नातेवाइकांकडे लग्नानंतर स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त जेवण होते, त्यासाठी तो पत्नीसह गेला होता. मात्र, जेवणाचा कार्यक्रम संपण्यापूर्वीच तो निघून आला होता.

दरम्यान, पत्नी घरी परतली तेव्हा तो तेथे नव्हता, त्यामुळे शोध घेतला असता तो आढळला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावालगत एका सीताफळाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.