विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई :- मराठी पाऊल पडते पुढे या शीर्षकातच मराठी माणूस सुध्दा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे, हे स्पष्ट होते. देशाच्या विकासात तो प्रमुख भुमिका निभावत असल्याचे दिसून येते. परंतु, प्रगतीची ही वाट ध्येयपूर्तीकडे नेणारी असली तरी त्यात असलेले खाच खळगे आणि वळणे पार करण्यासाठी मोठा संघर्ष करून यश संपादन करावे लागते. यश प्राप्त झाल्यानंतरच जग आपल्या मागे धावते, हे सूत्र शिवलाईन फिल्म निर्मित आणि प्रस्तुत मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे व मनोरंजक पध्दतीने मांडण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. त्यावेळी मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो, याचवेळी हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.
अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्निल मयेकर यांनी लेखन दिग्दर्शन केले आहे. मराठी पाऊल पडते पुढे हया चित्रपटात मुख्य नायकाच्या भुमिकेत ८३ हया बॉलिवूड चित्रपटात झळकलेला आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आहे. चिरागच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक हॅण्डसम हंक हीरो मिळालेला आहे. हया चित्रपटात त्याने रंगविलेला अँग्री यंगमॅन पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गोव्याच्या किनाऱ्यावर..' या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे मुख्य नायिकेच्या भुमिकेत आहे. 'मराठी पाउल पडते पुढे' हया चित्रपटाद्वारे चिराग आणि सिद्धी ही जोडी पहिल्यांदाच रोमॅटीक मुडमध्ये पाहायला मिळणार आहेत. यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेत्री नयन पवार, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. गीतकार रेश्मा कारखानीस, किरण पाटील, कृपेश पाटील आणि प्रवीण माळी यांच्या गीतरचनांना संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी संगीतबदध केले आहे. त्यावर स्वप्निल बांदोडकर, धनंजय सरतापे, निमिषा बाविस्कर, मयूरा खोले आणि प्रवीण माळी यांनी स्वरसाज चढवला आहे. प्रथमच हया चित्रपटात अहिराणी गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या माध्यमातून येणारा संपूर्ण निव्वळ नफा हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी, वृध्दाश्रमासाठी आणि हया चित्रपटातील कलाकारांसाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला पाहावाच लागेल ही नम्र विनंती. त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५ ४४ ११३३ या क्रमांकावर मिस कॉल द्या, असे आवाहन निर्माता श्री. प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.