कारवाईच्या भीतीने लाच घेणारा तलाठी पळाला



Solapur News : सोलापूर ते सांगली महामार्गामध्ये गेलेल्या शेत जमिनीमधील पाइपलाइन बाधित झाली. त्या पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई देण्याच्या बदल्यात ७ हजार रुपयांची लाच घेणारा तलाठी पळून जाण्यात यशस्वी झाला.

मात्र तलाठ्यासाठी लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या खासगी इसमाला लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल केला आहे.


सूरज रंगनाथ नळे असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर पंकज महादेव चव्हाण (वय २२ वर्षे) असे त्या खासगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदाराच्या मित्राच्या शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली - सोलापूर असा महामार्ग गेला आहे. त्याद्वारे शेतजमिनीमध्ये असलेली पाइपलाइन बाधित झाली आहे.


त्यामुळे या पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई रक्कम रुपये १ लाख ४३ हजार ७९४ रुपये मंजूर झाली आहे. ही भरपाई मिळण्यासाठी तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत असताना यातील संशयित चव्हाण याने तलाठ्याच्या वतीने लाचेची मागणी केली. त्यात तडजोडीअंती ७००० रुपये देण्याचे ठरले.



दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर या विभागाच्या पथकाने सापळा रचला. पण लाचेप्रकरणी कारवाईची कुणकूण लागताच नळे याने त्याच्या चार चाकी वाहनातून पळ काढला.


पण खासगी व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलिस अंमलदार मुल्ला, घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.