मच्छरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, मच्छरला पोलिसांनी केली अटक.


रायपूर, 16 एप्रिल : मच्छरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, मच्छरला पोलिसांनी केली अटक... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. मच्छरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तासांच पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि बेड्या ठोकत गजाआड केलं आहे. छत्तीसगडच्या रायपूरमधील हे प्रकरण आहे. पण नेमकं प्रकरण काय आहे ते पाहुयात.

रायपूरच्या सिव्हिल लाइन पोलिसात मच्छरविरोधात तक्रार देण्यात आली. गर्दीचा फायदा घेत मच्छरने मोबाईल चोरला असा आरोप करण्यात आला. मच्छरने 35,000 रुपयांचा मोबाईल चोरल्याचा आरोप आहे. कंदुल येथील रहिवासी सुरेंद्रकुमार डोंगरे यांनी ही तक्रार दिली आहे.

सुरेंद्र कुमार यांनी तक्रारीत म्हटलं की, 14 एप्रिल रोजी ते आंबेडकर चौकातील घाडी चौकातील आंबेडकर दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी गर्दीत त्यांचा वन प्लस कंपनीचा सुमारे 35,000 रुपयांचा मोबाईल चोरीला गेला. पोलिसांनीसुद्धा ही तक्रार नोंदवून घेतली आणि गुन्हाही दाखल केला. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला.


पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, सायबर सेलकडून माहिती मिळवली, गुप्तचरही तैनात करण्यात आले. अखेर 48 तासांत पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्यासह त्याचा साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. हा मच्छर म्हणजे रूपेश दीप नावाची व्यक्ती. जिला मच्छर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यासह सोनू ठाकूरलाही पोलिसांनी अटक केली. चौकशी केली असता त्यांनीही चोरीची कबुली दिली