भाजपा तक्रार पेटीपक्ष कार्यकर्ता असो की सामान्य जनता कोणालाही भारतीय जनता पक्षाबद्दल काहीही तक्रार अथवा सूचना असेल तर ती टपालपेटीत बिनधास्त टाकता येणार आहे. होय, भाजपने नरीमन पॉईंट येथील आपल्या प्रदेश कार्यालयात अशी व्यवस्था केली असून आजपासून त्याचा शुभारंभ झाला.
राज्यात अशाप्रकारचा प्रयोग करणारा भाजप हा पहिलाच पक्ष असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांची नेहमीच वर्दळ असते. मंत्री व लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी पक्ष कार्यकर्ते आतुर असतात. असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत नेत्यांना भेटून आपली गाऱ्हाणी मांडतात. मात्र, मंत्र्यांना भेटूनही काही स्थानिक अडचणींमुळे प्रश्न सुटत नाही. कार्यकर्त्यांच्या मनात ती घुसमट कायम असते. आपल्या पक्षाचे सरकार असूनही आपले म्हणणे नेते ऐकून घेत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना होते.

कार्यकर्त्यांना जाणवणाऱ्या या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने भाजपने आपल्या प्रदेश कार्यालयात टपालपेटी लावण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या टपालपेटीत भाजपचे सामान्य कार्यकर्ते नेत्यांबद्दल आलेला आपला अनुभव, तक्रार आणि सूचना मांडू शकणार आहेत. या सूचना अथवा तक्रारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहचणार आहेत. त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या जाणार असल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.