फाईल फोटो
सिंदेवाहीः वन्यप्राण्यांची शिकार करून त्याचे अवशेष शेतात ठेवल्याची माहिती ताडोबा अंधारी वाघ प्रकल्प चंद्रपूर बफर क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर शिवनी येथील मुरलीधर गायकवाड याचे घर तसेच शेतावर धाड टाकली. यावेळी शेतात वन्य प्राण्यांची हाडे आढळून आली. वन्य प्राण्यांची हाडे जप्त करून भारतीय वन्यजीव संरक्षण जिवंत अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुरलीधर गायकवाड फरार झाला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे यांनी मुरलीधर गायकवाड यांच्या घरी व शेतात वन कर्मचारी तसेच पंचासह पाहणी केली. यावेळी त्याचा शेतात पाहणी केली असता वन्य प्राण्यांची हाडे आढळून आली.
दरम्यान, फरार झालेल्या गायकवाडचा शोध घेण्याकरिता वन विभागाचे पथक रवाना झाले आहे. यापूर्वी मुरलीधर गायकवाड याच्यावर कासव व वन्य प्राण्यांची हाडे घरी बाळगल्याप्रकरणी वन गुन्हा नोंद असून तीन महिने चंद्रपूरच्या तुरुंगवासात राहावे लागले होते.