लोहखणीज वाहतूक करणाऱ्या ट्रकची नक्षल्यांनी केली जाळपोळ


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

नारायणपूर, 21 एप्रिल : लोहखणीज वाहतूक करणाऱ्या ट्रकची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना नारायणपूर जिल्ह्यातील कापसी-फरासगाव मार्गावर घडली. नक्षल्यांनी आधी झाड तोडून रस्ता अडवला व नंतर ट्रकची जाळपोळ केली. यात ट्रक पूर्णतः जाळून खाक झाला.

छत्तीसगडमध्ये नक्षल्यांद्वारे हिंसाचार सुरूच असून गेल्या काही दिवसांपासून नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नारायणपूर जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 12 किमी अंतरावर असलेल्या कापसी - फरासगाव या गावादरम्यान नक्षल्यांनी शुक्रवारी पहाटे नारायणपूरहून छोटेडोंगर लोहखनिजाकडे जात असलेल्या एका ट्रकला आग लावली. हे ट्रक छोटेडोंगरच्या उत्पन्नाच्या खाणीत गुंतले होते. तसेच घटनास्थळी एक बॅनरही लावण्यात आल्याचे कळते, त्यामध्ये खाण रद्द करुन निको कंपनीशी संबंधित लोकांना हाकलून द्या, असे लिहिले आहे. ट्रक पेटवण्याबरोबरच नक्षल्यांनी झाडे तोडून रस्ताही अडवला आहे. घटनेनंतर नारायणपूर-ओर्छा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक बंद आहे.