अन् चपलेने केला घात... दोन जण ठार तर चार गंभीर जखमी



पोंभूर्णा:- पोंभूर्णा-चिंतलधाबा रस्त्यावरील सोनापूर फाट्याजवळ विठ्ठलवाडा येथील कार्यक्रमात डिजे वाजवण्यासाठी जात असलेल्या अनियंत्रित झालेल्या टाटा एस गाडीने झाडाला धडक दिल्याने भिषण अपघात झाला. यात दोन ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारला संध्याकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली.
आनंद बोलमवार (वय २२) रा. पोंभूर्णा, अमन भोयर (वय २१) रा. मुल असे मृतकाचे नाव आहे तर जखमी मध्ये गोलू देशमुख (वय २१) रा.चितेगाव, लक्ष्मण बावणकर (वय २०) रा.मुल, ड्रायव्हर गितेश्वर बावणे (वय २५) रा.मुल, आयुष लाकडे (वय १७) रा. मुल असे गंभीर जखमींचे नाव आहे. सर्व जखमींना पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
मुल येथून पोंभूर्णा मार्गे विठ्ठलवाडा येथील कार्यक्रमात डिजे वाजविण्यासाठी जात असलेल्या टाटा एस गाडी क्रमांक (mh-34-av-0983) पोंभूर्णा-चिंतलधाबा मार्गावरील सोनापूर फाट्याजवळ सुरजागड लोह प्रकल्पाच्या वाहतूक करणाऱ्या भरधाव गाड्यांपासून बाजूला घेत असतांना एक्सलेटरवर ड्रायव्हरची चप्पल अडकल्याने गाडी अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यात पोंभूर्णा येथील डिजे आपरेट करणारा भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वैशाली बोलमवार यांचा लहान मुलगा आनंद बोलमवार हा जागीच ठार झाला. तर अमन भोयर हा पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झाला. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.