🤷🏻♀️ पत्नीने आपल्या पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी हा एक मजबूत आधार असू शकतो, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले आहे. तसेच, जर महिलेने पतीवर आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव आणला तर हेही घटस्फोटाचे कारण ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
👨🏻⚖️ न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा लग्नानंतर आईवडिलांसोबत राहतो. जर त्याची पत्नी त्याला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामागे काही योग्य कारण असायला हवे.
💁🏻♂️ *तो अधिकार पतीला...*
खंडपीठाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत आईवडील आणि मुलांचे नाते अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि समाजात प्रचलित असलेल्या प्रथांनुसार मुलाने आपल्या पालकांची काळजी घेणे स्वाभाविक आहे. परंतु, जर मुलाच्या लग्नानंतर त्याची पत्नी सामाजिक प्रथा किंवा नियम मोडून मुलाला असहाय पालकांच्या कुटुंबापासून दूर नेत असेल किंवा त्याला इतरत्र राहण्यास भाग पाडत असेल तर अशा पत्नीला घटस्फोट देण्याचा पतीला अधिकार आहे. कारण, ते आपल्या समाजाच्या नियमित प्रथेच्या विरोधात आहे.