प्रेयसी तसे करू देत नाही म्हणून तिच्या सव्वा वर्षाच्या बाळाला उकळत्या पाण्यात टाकून मारलेपुणे:  घटनेप्रकरणी बाळाच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम शरद कोळेकर रा. कोयळी ता. खेड जि. पुणे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. अनैतिक संबंधातून आरोपी विक्रमने बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रम आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल रोजी प्रियकर आरोपी विक्रम हा प्रेयसीच्या घरी गेला. प्रेयसीची मानलेली बहीणदेखील घरी उपस्थित होती. फोन आला म्हणून ती घराबाहेर गेली. याचदरम्यान बाथरूमध्ये बकेटीत असलेल्या उकळत्या पाण्यात अवघ्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला क्रूरतेने बुडवून गंभीररीत्या जखमी केले. मग, विक्रमने प्रेयसीचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली.

बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आल्याने मानलेली बहीण आत गेली. तिलादेखील आरोपी विक्रमने धमकावत घडलेली घटना कुठे सांगू नकोस असे संगितले. चिमुकल्या बाळाचे हात, पाय, डोके, पाठ गंभीररीत्या भाजले होते. तातडीने त्यास खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना पुण्यातील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पंधरा दिवसांच्या उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. अत्यंत भेदरलेल्या स्थितीत असलेल्या बाळाच्या आईने या प्रकरणी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. अद्याप आरोपी मोकाट असून त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

प्रेयसी प्रियकराला पत्नीसोबत संसार कर म्हणून सांगायची!

मृत्यू झालेल्या बाळाच्या आईचे आणि आरोपी विक्रमचे प्रेमसंबंध होते. परंतु, तू तुझ्या पत्नीसोबत राहा, चांगला संसार कर, असे वारंवार ती विक्रमला सांगायची. शारीरिक संबंधास नकार देत होती म्हणून त्याने प्रेयसीच्या बाळाचा जीव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रेयसी असलेल्या महिलेचादेखील विवाह झालेला असून ती पतीसोबत राहात नाही.