चामोर्शीच्या तरूणाची देसाईगंजला आत्महत्या

देसाईगंज येथे कामासाठी आलेल्या चामोर्शी तालुक्यातील तरुणाने किरायाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ एप्रिलला दुपारी घडली.

मुकेश गणपती सूरजागडे (३०, रा. तळोधी, ता. चामोर्शी) असे मयताचे नाव आहे. तो कामासाठी देसाईगंजला आला होता. भगतसिंग वॉर्डात राजू प्रधान यांच्याकडे तो महिनाभरापासून एकटाच किरायाने राहत होता. मुकेश सूरजागडे हा एका भंगारच्या दुकानात काम करत असे. त्याने २४ एप्रिलला दुपारी दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, बराचवेळ दरवाजा आतून बंद असल्याने घरमालकाने शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा तोडून पाहिले असता, मुकेशने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

कारण अस्पष्ट

 आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. देसाईगंज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.