धानोरा : दुचाकीचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकीवरस्वार आई व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (२१ एप्रिल) दुपारी २ वाजताच्या सुमारास धानोरा- गोडलवाही मार्गावरील घाट मंदिराजवळ घडली. या अपघातात शांताराम नोहरू आतला (वय २५) व त्याची आई रानूबाई नोहरू आतला (वय ५०) रा. सरांडा (गट्टा) असे जखमींचे नावे आहेत. जखमी शांताराम आतला याचे समोरच्या आठवड्यात लग्न असल्याने लग्न कार्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी गोडलवाहीवरून धानोरा तालुका मुख्यालयातील बँकेत पैसे काढण्यासाठी आईसोबत दुचाकी घेऊन येत असताना घाटावरील कालीमाता मंदिराजवळील वळणावर दुचाकीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.
दुचाकी रस्त्याच्या खाली गेल्याने आई व मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वन समितीचे नागरिक वन सुरक्षाकरिता जंगलात असताना अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची माहिती धानोरा ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली. रुग्णवाहिका आल्यानंतर जखमी आई व मुलाला ग्रामीण रुग्णालयात हलवून भरती करण्यात आले. धानोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले