अमिर्झा: ट्रॅक्टरने मलबा फेकण्याच्या कामावरील धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी 5 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार स्वीकारणाऱ्या अमिर्झा येथील सरपंचासह ग्रापं सदस्याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सरपंच सोनाली गोकुलदास नागापुरे (32) व ग्रापं सदस्य अजय भास्कर नागापुरे (40) असे आरोपींचे नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमिर्झा ग्रापंच्या सरपंच सोनाली नागपुरे व ग्रापं सदस्य अजय नागपुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून गटारे उपसण्याचे व ट्रॅक्टरने मलबा फेकण्याच्या कामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याकरीता 5 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 4 हजार रुपये देण्याचे ठरले.
मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एलसीबीच्या पथकाने याची शहानिशा करून सापळा रचला. दरम्यान, आरोपी ग्रापं सदस्य अजय नागापुरे यांनी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारून त्यातील 2500 रुपये लोकसेवक सरपंचा सोनाली नागापुरे यांना दिले व 1500 रुपये आपण ठेवत असताना एलसीबीच्या पथकाने त्यांना सरपंचाच्या घरी रंगेहाथ पकडले. दोन्ही लोकसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाच लुचपत विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे पोलिस उपधीक्षक अनिल लोखंडे, पोलिस निरीक्षक श्रीधर भासेले, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थू धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप घोरमोडे, संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्स्ना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.