कर्नाटक : कुठलीही निवडणूक असली की नेते प्रचारादरम्यान जनतेला मोठ मोठे अश्वासनं देत असतात. यातील काही अश्वासनं तर लोकांना अश्चर्यचकीत करणारे देखील असतात. कर्नाटक विधासभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान एका नेत्याने दिलेलं असंच एक अश्वासन सध्या जोरदार चर्चेत आलं आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहेत. विधानसभेतील 224 सदस्यांपैकी किमान 123 जागा जिंकण्याचे लक्ष्य प्रमुख पक्षांचे आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान अश्वासनांचा पाऊस पडत आहे.
परंतु कर्नाटकात (Karnataka Elections) एका नेत्याने आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न केल्यास तरुणींना दोन लाख रुपये देऊ असे अश्वासन दिले आहे. हे अश्वासन कोण्या ऐऱ्यागैऱ्या नेत्याने दिलेले नाही तर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी हे अश्वासन दिले आहे. त्यामुळे या अश्वासनाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले की, एखाद्या मुलीने शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न केले तर त्यांचा पक्ष तिला दोन लाख रुपये देईल. कोलार येथील 'पंचरत्न' रॅलीला संबोधित करताना कुमारस्वामी यांनी हे अजब आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले. आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपये देऊ असे अश्वासन त्यांनी दिले.
कुमारस्वामी हे अश्वासन देताना म्हणाले की, मझ्याकडे एक याचिका आली आहे. त्यात मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करत नाहीत असे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये दिले पाहिजे. या कार्यक्रमामुळे आपण शेतकऱ्यांच्या मुलांचा स्वाभिमान जपू शकू असे ते म्हणाले.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस, भाजप आणि कुमारस्वामींच्या जेडीएसपर्यंत सर्व पक्ष प्रचारात गुंतले आहेत. जेडीएसचे लक्ष्य 224 पैकी किमान 124 जागा जिंकण्याचे आहे. त्यांनी आतापर्यंत 93 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.