गडचिरोली, 16 एप्रिल : तालुक्यातील अलोणी शेतशिवारातील
दारुविक्रेत्यांचा तब्बल 19 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तीपथने संयुक्तरित्या केली. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 9 किमी अंतरावर असलेल्या अलोणी गावात अनेक वर्षांपासून अवैध दारुविक्री केली जात आहे. दारुविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावात गडचिरोली, जेप्रा, राजगाठा माल, राजगाठा चेक, बोदली माल, तुकुम, विश्रामपुर या गावातील लोक दारु पिण्यासाठी येतात. सोबतच परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठाही केला जातो. या गावातील विक्रेत्यांनी दारु गाळण्यासाठी शेतशिवारात ठिकठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली असता, तब्बल 19 ड्रम मोहफुलाचा सडवा व दारु गाळण्याचे साहित्य आढळून आले. घटनास्थळी मिळून आलेला संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलिस नाईक कलाम पठाण, मुक्तीपथचे रेवणाथ मेश्राम, स्वीटी आखरे यांनी केली.