पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ढोल ताशा पथकाच्या तरुणांना घेऊन मुंबईच्या दिशेला जाणारी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला; तर 29 जण जखमी झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथील अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सवात शुक्रवारी (दि. 14) रात्री केलेले ढोल वादन या पथकातील 13 वादकांचे अखेरचे वादन ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर येथील अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सवाचे 14 व 15 तारखेला आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुक्रवारी (दि. 14) सकाळी नेहमीप्रमाणे मंडळाची सामूहिक बुद्धवंदना, सकाळी 11 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. त्यानंतर मुंबई, गोरेगावमधील बाजीप्रभू ढोल ताशा पथकाच्या वादकांच्या ढोलवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढोलवादनाच्या दणदणाटात 8 ते 80 पार्क (एट टू एटी पार्क) ते सृष्टी चौकातील बुद्धविहारापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी मिरवणूक सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झाली. यामध्ये सहभागी झालेल्या वादकांनी मोठ्या आवेशात ढोलवादन केले. निळा झेंडा अंगाखांद्यावर घेत मोठ्या उत्साहाने नाचविला. महिला वादकांचादेखील यात लक्षणीय सहभाग होता. रात्री अकराच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर या वादकांनी तासाभराची विश्रांती घेतली व सुदर्शन चौकात रात्रीचे जेवण केले. त्यानंतर ढोल ताशा बांधून रात्री दीड ते पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गोरेगावच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला.
मंडळाचे नियोजित कार्यक्रम रद्द
दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास वादकांच्या बसला अपघात झाला. यामध्ये 12 वादकांचा मृत्यू झाल्याची बाब अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समजली. काही मिनिटांपुर्वी सोबत जेवण केलेले, हसत खेळत निरोप दिलेले 13 वादक आता आपल्यात नसल्याची बाब समजताच या परिसरावर शोककळा पसरली. त्यामुळे मंडळाच्या वतीने या महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेले शनिवारचे सर्व कार्यक्रम रद्द करत, मंडळाच्या वतीने मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत मोठ्या उत्साही वातावरणात ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडला. मोठ्या आनंदात ढोल वाजविणारे काही सहकारी आता काही वेळानंतर हे जग सोडून जातील, यावर आमचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. मात्र, घटनास्थळी भेट दिल्यानंतर या दुर्दैवी घटनेवर विश्वास ठेवावा लागला. या मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
– राजेश जेटीथोर, सदस्य, अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सव