अपघात:ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळून 13 ठार; ओव्हरटेक करण्याच्या नादात घडली दुर्घटना, ट्रॉलीत होते 30 हून अधिक प्रवाशी


उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूरच्या तिलहर निगोही रोडवर शनिवारी ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून खाली कोसळली. जिल्हाधिकाऱ्यांनी या अपघातात 13 जण ठार झाल्याची पुष्टी केली आहे. ट्रॉलीत 30 ते 35 प्रवाशी होते. ती पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. पीडित सनौरा गावचे होते. ते भागवत कथेसाठी पाणी आणण्यासाठी जात होते.

SP एस आनंद यांच्या माहितीनुसार, या घटनेत 20 हून अधिकजण जखमी झालेत. घटनास्थळी SDRF व NDRF चे पथक पोहोचले आहे. जखमींना लगतच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयालाही अलर्ट करण्यात आले आहे. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांत बहुतांश महिला व मुलांचा समावेश आहे.





ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात

दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व डीसीएमने काही जण अजमतपूर गावात होणाऱ्या भागवत कथेसाठी पाणी आणण्यासाठी जात होते. यावेळी दोन्ही ट्रॅक्टर एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात एक ट्रॅक्टर ट्रॉली पुलाचा कठडा तोडून जवळपास 40 फूट खोल नदीत कोसळली. घटनेनंतर घटनास्थळी अफरातफरी माजली.




आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिसांना माहिती देत ट्रॉली सरळ केली. त्यानंतर ट्रॉलीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.

प्रत्यक्षदर्शी म्हणाला - मी पुढे होतो, मागे पाहिले तर ट्रॉली नदीत कोसळली होती

ट्रॅक्टर -ट्रॉलीपुढे दुचाकीवर जाणाऱ्या रामवीर यांनी सांगितले - "गावात भागवत कथा होणार होती. मी त्या ट्रॅक्टरच्या पुढे जात होतो. मागे मोठा आवाज झाला. मी मागे वळून पाहिले असता ट्रॅक्टर नदीत कोसळले होते. ट्रॉलीतील अनेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाता माझी पत्नीही जखमी झाली."




भागवत कथेपूर्वी निघणार होती कलश यात्रा

रुग्णालयात उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले की, आजच भागवत कथा सुरू होणार होती. तत्पूर्वी, नदीतून पाणी आणून कलश यात्रा काढण्यात येणार होती. त्यामुळे गावातील काहीजण गर्रा नदीचे पाणी आणण्यासाठी गेले होते. पण रस्त्यातच अपघात झाला. आता कथा मंडपासह संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे.

सीएम योगींनी व्यक्त केला शोक

सीएम योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचीही घोषणा केली आहे.