Rahul Gandhi: बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार, अडीच लाख सरकारी पदं भरणार; राहुल गांधींची कर्नाटकात घोषणा



Yuva Nidhi Scheme: कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरूल केली आहे.

कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.

दोन वर्षांसाठी बेरोजगारांना दरमहा 3,000 रुपये

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकसाठी केलेली सर्वात मोठी घोषणा म्हणजे दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये देण्याची. ते म्हणाले की, "बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे."

राहुल गांधींनी कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे.
काम करण्यासाठी 40 टक्के कमिशन; राहुल गांधींचा आरोप

यासोबतच 10 लाख खासगी नोकऱ्या देण्याचे आणि 2.5 लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकमधील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. कोणतेही काम करण्यासाठी 40 टक्के कमिशन घेतले जाते. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले, पण त्यांनी काहीच केले नाही. भाजपच्या आमदाराच्या मुलाकडून आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले मात्र कारवाई झाली नाही.

राज्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्या देणार

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी पदेही भरली जातील, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली. महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ देणार असल्याचंही ते म्हणाले.