Pune : महिलेचे हातपाय बांधून मासिक पाळीच्या रक्ताची विक्री; पुण्यातील अघोरी प्रकारानं राज्यात खळबळ


पुणे : जादुटोणा करण्यासाठी महिलेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी आणि संतापजनक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर पुणे पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
त्यानंतर आता या धक्कादायक घटनेची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्मशानभूमीत जादुटोण्याची घटना समोर आली होती.

त्यानंतर आता विश्रांतवाडीत महिलेच्या मासिक पाळीतील रक्त विकण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीत राहणाऱ्या एका महिलेला मासिक पाळी आली होती.
त्यावेळी जादुटोण्यासाठी तिच्या सासरच्यांनी तिला मासिक पाळीतील रक्ताची मागणी केली.
त्यासाठी महिलेनं नकार दिल्यानंतर सासरच्यांनी विवाहितेचे हातपाय बांधून तिच्या मासिक पाळीतील रक्ताची विक्री केली.

त्यानंतर पीडित महिलेनं सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत सर्व सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती सागर ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.