देलनवाडी : कोणतीही योजना प्रामाणिकपणे राबविल्यास शासन आणि सामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था. संस्थेने सन २०२१- २२ च्या खरीप आणि रब्बी हंगामात १.०८ अशी अत्यंत कमी तूट दाखवून जिल्ह्यात सर्वात जास्त नफा देणारी आविका संस्था ठरली आहे.
१३ गावाचा धान व्यवहार असणाऱ्या देलनवाडी आविका संस्थेने सन २०१६-१७ मध्ये आदिवासी विकास महामंडळ नागपूर नाशिक यांच्याकडून आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त असलेल्या संस्थेने अटल महापणन विकास अभियानांतर्गत बी- बियाणे केंद्र विक्री परवाना घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वाजवी दरात बी-बियाणे मिळावे या उद्देशाने बी-बियाणे केंद्र देलनवाडी येथे सुरू केले. हंगाम २०१९-२० मध्ये संस्थेला नफा प्राप्त झाला. पारदर्शक व्यवहार, विश्वास आणि सहकार यांच्यातत्त्वावर आदिवासी विविध कार्यकारी संस्था देलनवाडीचा कारभार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून, तेरा गावच्या शेतकऱ्यांना ही संस्था विश्वासपात्र ठरली आहे.
संस्थेचे माजी व्यवस्थापक आर. एस. धारणे आणि भाऊराव घोडमारे यांचा संस्थेच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर विद्यमान व्यवस्थापक दिलीप कुमरे यांनी या संस्थेची यशस्वी वाटचाल केली. संस्थेचे कार्यकारी मंडळ अध्यक्ष बारीकराव पदा, उपाध्यक्ष रत्नाकर धाईत, संचालक ईश्वर मडावी, चोखाराम मोहरले, विनायक गरमडे, वासंती कोकडे, भाग्यरता मडावी आदी संचालक कार्यरत आहेत.