तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार


नागपुर: नोकरी लागल्याचे सांगून घरून निघून गेलेल्या प्रेयसीला प्रियकराने मारहाण करून बलात्कार केला. तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. मोनल राजेंद्र मेश्राम (२७, रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटक्यात राहणारी १७ वर्षीय पीडित मुलगी दहावीत असताना आरोपी मोनलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.


दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर २०२० पासून तो तिचे लैंगिक शोषण करायला लागला. घरी कुणी नसताना तिला बळजबरीने नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिला मोनलने लग्न करण्याचे आमिष दाखवून घर सोडण्याचा सल्ला दिला. मुलीनेही मुंबईतील खासगी कंपनीत नोकरी लागल्याचे सांगून घर सोडले. त्यानंतर दोघेही जरीपटक्यात भाड्याने खोली घेऊन राहायला लागले. गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नीप्रमाणे दोघेही राहत होते.मोनलला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर मारझोड करीत प्रेयसीवर बलात्कार करीत होता. तसेच तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. तिचे कुण्यातरी युवकाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय घेऊन मारहाण करीत होता. २८ फेब्रुवारीला त्याने दारु पिऊन तिला मारहाण केली आणि लैंगिक शोषण केले. रोजच्या मारहाणीला कंटाळून ती आईकडे गेली. तिची अवस्था बघून आईने काहीतरी विपरित घडल्याचा अंदाज लावला. त्यामुळे तिने जरीपटका पोलीस ठाण्यात नेले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोनलला अटक केली.