वृत्तसंस्था / मुंबई : 19 वर्षे वयाच्या तरुणीने 16 वर्षे वयाच्या मुलाला पळवून नेले. त्याला डांबून ठेवत त्याच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात तरुणीवर पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल केलेला गुन्हा सिद्ध झाला आणि जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या तरुणीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. एखाद्या तरुणीवर बलात्काराचा आरोप होणे आणि तो सिद्ध होऊन शिक्षा होण्याची देशातील ही पहिलीच घटना असावी. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना स्वच्छतेसाठी देशभरात प्रसिद्धी पावलेल्या इंदूर शहरातील आहे.
2018 मध्ये बाणगंगा भागात राहणाऱ्या एका महिलेने आपला अल्पवयीन मुलगा दूध आणण्यासाठी दुकानावर गेला तो घरी परतलाच नाही, अशी तक्रार पोलिसांकडे केली. अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याने इंदूर पोलिसांनी झपाट्याने तपासाची चक्रे फिरवली. मुलाचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी गुजरातेत जाऊन मुलाला ताब्यात घेतले असता धक्कादायक प्रकार समोर आला. आपण स्वखुशीने आलो नसून आपल्याला पळवून आणल्याचे त्याने सांगितले. एवढेच नाही, तर आपल्यावर अनेकवेळा तरुणीने बलात्कार केल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस थक्कच झाले. पोलिसांनी मुलासोबतच त्या तरुणीलाही ताब्यात घेतले..
19 वर्षांच्या या तरुणीने त्याच भागातील 16 वर्षे वयाच्या मुलास फूस लावून गुजरातला पळवून नेले. गुजरातेत भाड्याने एक खोली घेतली. मुलाला एका टाईल्सच्या कारखान्यात नोकरीला लावले. प्रदीर्घ काळ या तरुणीने त्या अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषण केले. इंदूर पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्या अंतर्गत त्या तरुणी विरोधात आरोपपत्र दाखल केले. मुलाने सर्व आपबिती न्यायालयाला कथन केली. न्यायालयात सर्व आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषण केल्याच्या प्रकरणात तरुणीला दोषी ठरवून 10 वर्षे कारावास आणि 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.