जळगाव शहरातील सात वर्षांपासून अमृत योजनेचे काम चालू आहे.हा काळ सुद्धा जास्त झाला.एकाच योजनेच्या नावाने सात आठ वर्षे नागरिकांना वेठीस धरणे ठिक नाही.जग फास्ट जाते मग जळगाव स्लो का? इतक्या काळात तर किल्ला बांधला जात होता.जेंव्हा मशीनरी नव्हती.आता तर जेवण आणि शौच सोडून सर्वच काम मशीन करते.तरीही इतका वेळ का? कदाचित जळगाव शहरातील एकाही इंजिनिअर ला हे ज्ञान नसावे.किंवा इंजिनिअर हे झेंडू पाटील कॉलेज मधे शिकले असावेत.
अमृत योजनेच्या नावाखाली शहरातील रस्ते बनवणे आठ वर्षे तहकूब ठेवले.म्हणे रस्ते पुन्हा खोदावे लागतील.म्हणून कोटी कोटीचा निधी आला.पेपरला बातमी आली.पण काम शुन्य.आमदाराने लोकांना मामा बनवले.तव्यावर पाणी शिंपडून भुकेले मारले.सेम टू सेम तसेच.जर निधी आला होता तर ज्या रस्त्यावर अमृत चे पाईप लाईन चे नियोजन नाही,ते रस्ते बनवले असते.असे अनेक रस्ते आहेत.जसे कि,शंभर फुटी रोड .रेलवे लाईन लगतचा रोड.ईच्छा देवी ते श्रीकृष्ण लॉन पर्यंत रोड.असे अनेक रोड आहेत.पण या रोड आमदाराला हे रोड दिसत नाहीत.कारण करायचेच नाहीत.म्हणून अमृत योजनेचा बहाणा सांगून मोकळे झाले. स्वतः आमदार सुरेश भोळे आणि दोन महापौर यांना मी भेटून सुचवले होते.पण म्हणे शंभर फुटी रोड सुद्धा अमृत योजनेत आहेत.किती लबाडी मारता? कि लोकांना मुर्ख समजता?
जर रस्ते बनवायचे नव्हते तर निधीत फेरीवाला,फळभाजी विक्रेत्यांसाठी ओटे तरी बनवले असते.तर म्हणे हा निधी फक्त रस्त्यांसाठी होता.जसा काही ब्रम्हदेवाने निश्चित केला होता.काय माणसे आहेत? कामचोर कि अक्कलहिन?कर आमचा.नागरिकांचा.निधी महाराष्ट्र सरकार देते.तर मग,निधी हवा तेथे वळवता येतो.यासाठी इंग्लंड, अमेरिका,रशिया, जपान ची परवानगी लागते का?पण तितका यांच्या ह्याच्यात दम पाहिजे.पण हे मामा लोक कधीही भाच्याचे कल्याण करू शकत नाहीत.तर मग,भाच्याने किती दिवस मामाच्या गाई चारायच्या.जर मामा ताकाला तोंड लावू देत नसेल तर!
आठ वर्षे आम्ही जळगाव च्या नागरिकांनी कशीतरी काढली.खड्डा आला कि काढली शिवी.संताप तर इतका येत होता कि,याच खड्ड्यात आमदाराला आंघोळ घालायची.पण खड्डा अपवित्र होऊ नये म्हणून सोडले.तरीही काही विक्षिप्त लोकांनी खड्ड्यात झाडे लावली.काही मनोविकलांग लोकांनी खड्ड्याभोवती रांगोळी काढून अगरबत्ती लावली.अशी अवस्था खिलौना सिनेमातील संजीव कुमार ची सुद्धा झाली नव्हती.आमदार मामा ,हे पाप कसे फेडणार?
आता अमृत योजनेचे अमृत पाईपात भरले.येईल हळूहळू नळातून.म्हणून रस्ते बनवणे चालू केले.तरीही या पापी लोकांनी तब्बल ४८ रस्ते एकाच वर्क ऑर्डर वर एकाच मक्तेदाराला दिले.शिवाजीनगर पुल ही त्यालाच दिला.हा नालायकपणा नाही का?कि बदमाषी म्हणू? आता तो मक्तेदार कोणता रस्ता किती बनवतो,तेच कळत नाही.कुठेही टेक्नीकल इन्फॉर्मेशन बोर्ड नाही. कसे कळेल लोकांना?अंधारत शिरा कि शेण?तसेच रस्ता डांबरी कि सिमेंट? सर्वच गोलमाल.हे गौडबंगाल का खपवून घ्यायचे?जर आमदाराने आणि नगरसेवकांनी स्वताची दुकानदारीतून रस्ता बनवला असता तर आम्हाला शेणाचा ही चालला असता.पण कर आम्ही नागरिक देतो.पैसा आमचा.निधी आमच्यासाठी.रस्ता आमच्याच साठी.तर मग,असे डोळे मिटून का राहायचे?
कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंत रस्ता अर्धवट बनवला.आणि श्रेयाचे बोर्ड लावले.जळगावचे बुद्धीमान व प्रतिभावंत आमदार सुरेश भोळे यांच्या सुपीक डोक्यातून कल्पना पिकली म्हणून हा रस्ता बनवला आहे.माननिय, सन्माननीय आदरणीय ,पुजनिय,वंदनिय शिंदे, फडणवीस, गुलाबराव, महाजन यांनी खूप कष्ट घेतले म्हणून रस्ता बनला आहे.हा रस्ता बनवतांना किती प्रसववेदना झाल्या असतील? किती हापापलेपणा प्रसिद्धीसाठी? शिंदे आणि फडणवीस या रस्त्यावर कधी सॅटेलाईट लॉंचींग यान मधून तरी येथे उतरले आहेत का? ते नसले तर त्यांचा रोबोट तरी! आता आम्ही आक्षेप घेतला कि, कोणत्या कायद्यात,कोणत्या शिष्टाचार मधे हे लिहीले आहे कि, कोणत्याही मंत्री संत्री चे नावाचे बोर्ड लिहून लोकांना मुर्ख बनवायचे? यापैकी एकाही आमदाराने विचारले नाही कि,टेक्नीकल इन्फॉर्मेशन बोर्ड का लावले नाही?हे आमदार आहेत कि मालदार?आता लाजेशरमेने त्या बोर्ड वर कागद चिपकवला आहे.
याच मक्तेदाराने काव्यरत्नावली चौक ते वाघनगर रस्ता अपुरा सोडला आहे.आम्ही महापौर महाजन यांना तेथे बोलवून दाखवले.पण रस्ता पुढे सरकत नाही.आमदार भोळे तर शोधूनही सापडत नाहीत.एक दिवस डी मार्ट जवळ बैनर वर सापडले.तेथेही रस्ता अपुरा आणि आमदारांनी लोकार्पण केले.या बुद्धीमान आमदारांनी लोकार्पण शब्द कोठून शोधला,तेच जाणोत.म्हणजे आमदार भोळे आता लोकांना गर्भात असलेले रस्ते अर्पण करायला लागलेत.पोरगं पोटात आणि नाव कॉलेजात.असाच अद्भुत प्रकार बुद्धीमान आमदारांनी करून दाखवला.पण. आमदार साहेब, आम्ही प्रीतम वाईन घेतली तरीही लुडकलो नाहीत.शुद्धीवर आहोत.
महाबळ कॉलनीतील संभाजीनगर चौक ते गाडगेबाबा चौक चा रस्ता मागील आठ वर्षांपासून भग्न झाला होता.लोक बोलत नाहीत,रडत नाहीत.दहशतीखाली वावरत आहेत.नगरसेवक नागरिकांना दम भरतात.म्हणे शिवराम पाटील यांना सांगू नका. आम्ही जागृत जनमंच ने तरीही बोंबाबोंब केली.आता त्या रस्त्यावर डांबरीकरण चालले आहे.खाली साधी माती टाकली.मुरुमचा खडा टाकला नाही.म्हणून सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री अहिरे व महानगरपालिका अभियंता श्री सोनगिरे यांना बोलवले.त्यांनी मिस्टेक मान्य केली.सुचना तर दिली.पण बघू, मक्तेदार मोठा कि अभियंता मोठा?
त्या रस्त्यावर मोहाडी रोड कडून मोठा पाणीप्रवाह येतो.तो सरळ उतारावर न घेता,साईफन पद्धतीने पाणी उपसणार आहेत.खालून वर चढवणे.म्हणजे पुन्हा फटफजिती.स्थानिक नागरिक सांगतात कि पावसाळ्यात येथे गुडघाभर पाणी तुंबते.तर खोलगट जागेवर कल्व्हर्ट टाकून पाणी उताराकडे वाहू द्या.तर अभियंता व मक्तेदार म्हणतात, अमेरिकेची परवानगी घ्यावी लागेल.तर मग,घ्या परवानगी.अमेरिकेची घ्या किंवा मंगळावरील एलियन ची घ्या.पण कल्व्हर्ट बनवा.
याबाबत एकही नगरसेवक किंवा आमदार बोलत नाहीत.अरे! रस्ता नागरिकांसाठी बनवता कि मक्तेदार साठी? कल्व्हर्ट बनवण्यासाठी का कोणाची परवानगी लागते? बहाणेबाजी नको,नागरिक सांगतील तसे रस्ते बनवा.नाहीतर पैसे घेऊनही मतदान करणार नाहीत.बाबा ,बुवांना आणून किर्तन करावे लागेल पांच वर्षे.
हे वास्तव अभ्यासता एकही नगरसेवक आणि आमदार प्रामाणिक नसल्याचे सिद्ध होते.राजकारण हा धंदा केला आहे यांनी.कोणत्याही कामाचा निधी आला किंवा आणला तर जनतेला सुविधा कमी आणि नगरसेवक व आमदारांना आर्थिक फायदा जास्त होतो.जनसुविधासाठी कोणताही नगरसेवक व आमदार लढत नाहीत.ते लढतात त्यांना मलिदा मिळवण्यासाठीच.हे जमीनीवरचे वास्तव गणित आम्ही नागरिकांना समजावून देत आहोत.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव