भेट अधुरी; होळीच्या दिवशी बापलेकीवर काळाची झडप म्हशीला वाचविताना कारला अपघात
 आरमोरी : आठ दिवसांपासून एकीमेकीपासून दूर असलेल्या आई आणि मुलीची अवघ्या पाचदहा मिनिटांत भेट होणार होती. दोघीही एकमेकींच्या भेटीसाठी आतुर झाल्या होत्या. परंतु ती भेट नियतीला मान्य नव्हती. आई-मुलीची भेट होण्याआधीच आईपासून मुलीला आणि सोबतच पतीलाही नियतीने हिरावून घेतल्याची दुःखद घटना सोमवारी रात्री साडेसात वाजता घडली.

सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना सोमवारी झालेल्या कार अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याने आरमोरीकरांचे मन हळहळले. आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीला होळीनिमित्त तिच्या आईच्या भेटीसाठी आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने आरमोरीकडे येणाऱ्या एका शिक्षकाच्या वाहनाने वडसा आरमोरी मार्गावरील कालिमाता मंदिराजवळ रस्त्यावर बसून असलेल्या म्हशीला धडक दिली. वाहन झाडाला धडकून पलटी झाले. या भीषण अपघातात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचेनाव रमेश मोतीराम ताराम (वय ३५ रा. कलकसा ता. देवरी, जिल्हा गोंदिया) व त्यांची मुलगी रावी रमेश ताराम (वय अडीच वर्ष) असे आहे. या घटनेने समाजमन हेलावले. अपघातात ठार झालेले व पेशाने शिक्षक असलेले रमेश ताराम हे देवरी तालुक्यांतील ईस्तारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांची पत्नी सुनंदा कुमरे या आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. या शिक्षक दाम्पत्याला रावी ही अडीच वर्षांची मुलगी होती. ती आपल्या आईकडे आरमोरी येथे राहत होती. परंतु आठ दिवसांपूर्वी रमेश ताराम यांनी मुलगी रावी हिला आरमोरीवरून आपल्या कलकसा गावाला नेले होते. होळीनिमित्त आरमोरीला येताना अपघात घडला.