नागपूर : प्रियकराने दगा दिल्याने विवाहितेची आत्महत्या


नागपुर: तीन वर्षाच्या मुलाची आई असणाऱ्या महिलेने ऐनवेळी प्रियकराने दगा दिल्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता कोराडीत घडली. करिना (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना हिचे गेल्या चार वर्षांपूर्वी लग्न झाले. तिचा पती खासगी कंपनीत नोकरीवर आहे. तर फावल्या वेळात एका पिझ्झा कंपनीसाठी काम करतो. कामाच्या व्यस्तते मुळे तो तिला वेळ देत नव्हता. त्यामुळे घरात एकटी राहणाऱ्या करिनाचे शेजारी राहणाऱ्या युवकावर जीव जडला. त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला तीन वर्षाचा मुलगा असल्याने ती घर सोडू शकत नव्हती. दरम्यान दोघांच्या प्रेमाची कुणकुण पतीला लागली. त्याने पत्नीला फटकारले. परंतु, तिने प्रियकरासाठी पतीला सोडण्याची मनाची तयारी केली. मात्र, प्रियकराने वेळेवर दगा दिला. त्यामुळे विचाराच्या गर्तेत सापडलेली करीना गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. रविवारी दुपारी दोन वाजता घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.