अन् नवरदेव वरात सोडून पोहोचला अंत्यसंस्कारात !






नवरगाव:  मागील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लग्न जुळले. मंदिरात लग्न लावून पुन्हा गावकरी व नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न लावले आणि सायंकाळी डीजेच्या तालावर वाजत नाचत लग्नाची वरात जात असताना अचानक घराशेजारील व्यक्ती मृत पावल्याची बातमी आली. स्वतःचा आनंद बाजूला सारून नवरदेवाने डीजे बंद करीत शेजारधर्म पाळत मृतकाच्या घरी पोहोचत अंत्यसंस्कारात सहभागी झाला.



सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव
येथील अनिल सामुसाकडे मागील पाच सहा वर्षापासून लग्न अनिल सामुसाकडे मुली बघत होता. मात्र, विविध कारणांमुळे त्याचे लग्न जुळेना. शेवटी ब्रम्हपुरी तालुक्यातील एक मुलगी त्याच्या प्रेमात पडली. कसेबसे एका मंदिरामध्ये काही नातेवाइकांच्या शेजाऱ्याच्या उपस्थितीत लग्न लावले. हे लग्न बाहुला-बाहुलीसारखे झाल्याने नवरदेव नवरी व नातेवाइकही आनंदी

नव्हते. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा सर्व नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उत्साहात पार पडला.

डीजेच्या तालावर अनिलची वरात निघाली. मित्रमंडळी डीजेच्या तालावर करण्यासाठी तल्लीन होऊन नाचत असताना नवरदेवाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचे निधन झाल्याची वार्ता नवरदेवाच्या कानावर आली.

शेजारधर्म पाळत नवरदेवाने डीजे बंद करून वरात तिथेच थांबविली व तो दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला आणि अंत्यसंस्कारातही सहभागी झाला.